
नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्लॅटिनम गटातील मोबाईल ग्राहकांसाठी प्रायोगिक तत्वावर फोरजी नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. प्लॅटिनम सदस्यत्व असणाऱया तमाम एअरटेलच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. फोरजी नेटवर्कच्या माध्यमातून या ग्राहकांना जास्तीत जास्त जलद सेवेचा उपयोग करून घेता येणार आहे. एअरटेलने थँक्स प्रोग्राम अंतर्गत 499 रुपये आणि त्यापेक्षा जास्तचा प्लॅन घेणाऱया पोस्टपेड मोबाईल ग्राहकांना प्लॅटिनम गटात समाविष्ट केलेले आहे. या ग्राहकांना कॉल सेंटर वा रिटेल स्टोरमध्ये रेड कार्पेट ग्राहक सेवा देण्याबरोबरच त्यांची काळजीही घेतली जाते. प्लॅटिनम ग्राहकांना एअरटेलच्या कोणत्याही सेवेसाठी जास्त वेळ थांबावे लागत नाही.
3 विमा कंपन्यांच्या खात्यात 12 हजार 45 कोटी

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या तीन विमा कंपन्यांच्या खात्यात सरकारने 12 हजार 450 कोटी रुपयांचे भांडवल जमा केले असल्याचे सांगण्यात येते. त्यांना एकाअर्थी आर्थिकदृष्टय़ा आधार देण्याबरोबरच व्यवसाय वाढीकरीता ही रक्कम उपयोगी येईल, असे सरकारने म्हटले आहे. ओरियंटल इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनी यांना चालू आर्थिक वर्षात 3 हजार 475 कोटी रुपये मिळतील आणि उर्वरीत 6 हजार 475 कोटी एक किंवा दोन टप्प्यात दिले जातील.
एडीबी 30-35 अब्ज डॉलर्स जमविणार

नवी दिल्ली : आशियाई विकास बँक (एडीबी) 2020 मध्ये भांडवली बाजारातून 30 ते 35 अब्ज डॉलर्सची रक्कम जोडण्याची योजना आखत आहे, असे कळते. बँकेने गुंतवणुकीस चालना देण्यासाठी 3 वर्षात चार अब्ज डॉलर्सच्या बाँडची विक्री केली आहे. एडीबीने वर्ष 2020मध्ये भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे म्हटले आहे. यासाठी 0.25 टक्के क्याजदर आहे. यासाठी चालू वर्षात दोन वेळा पेमेंट करावे लागणार आहे.








