पाचवी व शेवटची कसोटी, पहिला दिवस : ट्रव्हिस हेडचे शतक, सामन्यात पावसाचा व्यत्यय
होबार्ट / वृत्तसंस्था
पावसाने व्यत्यय आलेल्या पाचव्या व शेवटच्या दिवस-रात्र ऍशेस कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने 6 बाद 241 धावांपर्यंत मजल मारली. ट्रव्हिस हेडने 113 चेंडूत 12 चौकारांसह 101 धावांचे योगदान दिले. कॅमेरुन ग्रीनने (8 चौकारांसह 74) शानदार अर्धशतक साजरे केले. याशिवाय, मार्नस लाबुशानेने (53 चेंडूत 9 चौकारांसह 44) उत्तम फटकेबाजी केली. मात्र, पावसामुळे दिवसभरात केवळ 59.3 षटकांचा खेळ होऊ शकला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ट्रव्हिस हेडने या सामन्यात कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. मात्र, त्यानंतर पुढील चेंडूवरच तो बाद झाला. गुलाबी चेंडूवरील या लढतीत डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ हे दोन्ही दिग्गज फलंदाज शून्यावरच बाद झाले. सिडनीतील द्विशतकवीर उस्मान ख्वाजा देखील 6 धावांवरच तंबूत परतला. या पडझडीमुळे एकवेळ ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी दैना उडाली होती. त्यानंतर लाबुशाने व हेड यांनी मात्र डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. इंग्लंडतर्फे ब्रॉड व रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 6 बाद 241 (ट्रव्हिस हेड 113 चेंडूत 12 चौकारांसह 101, कॅमेरुन ग्रीन 109 चेंडूत 8 चौकारांसह 74, मार्नस लाबुशाने 53 चेंडूत 9 चौकारांसह 44, कॅरे नाबाद 10, मिशेल स्टार्क नाबाद 0. अवांतर 6. ब्रॉड व रॉबिन्सन प्रत्येकी 2 बळी. वूड व ख्रिस वोक्स प्रत्येकी 1 बळी).









