सहकारी महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचे प्रकरण, ऍशेसच्या उंबरठय़ावर धक्कादायक निर्णय
होबार्ट / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टीम पेनने शुक्रवारी कसोटी नेतृत्वाचा राजीनामा देत क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला. 2017 मध्ये एका सहकारी महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यावरुन त्याची चौकशी झाली होती. या कारणावरुन त्याने नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. ऍशेस मालिका अवघ्या दोन-तीन आठवडय़ांच्या उंबरठय़ावर असताना 36 वर्षीय टीम पेनचा हा निर्णय धक्कादायक मानला जातो. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी दि. 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवली जाणार आहे.
7 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 2017 च्या आसपास टीम पेनला कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळाली होती. त्याच दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया व क्रिकेट टास्मानियाने टीम पेनची संयुक्त चौकशी केली होती आणि या प्रकरणी त्याला क्लीन चीट देखील मिळाली होती. मात्र, ते मेसेज आता सार्वजनिक केले जाण्याची शक्यता गृहित धरत राजीनामा देत असल्याचे पेनने म्हटले आहे.
‘मी आज ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय कठीण होता. पण, माझ्या, माझ्या कुटुंबियांच्या व क्रिकेटच्या हिताच्या दृष्टीने याची आवश्यकता होती’, असे टीम पेन याप्रसंगी म्हणाला. अर्थात, नेतृत्वाचा राजीनामा दिला असला तरी खेळाडू या नात्याने पेन कसोटी संघात समाविष्ट असणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम पेनचा कसोटी नेतृत्वाचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कर्णधार निवडीची प्रक्रिया त्यांनी सुरु केली. पेनने संदेश पाठवले, त्या सहकारी महिलेने 2017 मध्येच आपली नोकरी सोडली आहे.









