मुंबई :
मुकेश अंबानी यांनी तेलापासून प्रारंभ केलेला व्यवसाय आज दूरसंचार क्षेत्रात क्रांती करत असून याच्या जोरावरच रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील दुसऱया नंबरचा ब्रँड बनू शकला आहे. पहिल्या स्थानी ऍपलची झेप कायम असल्याची माहिती फ्यूचरब्रँड निर्देशांक 2020 मध्ये दिली आहे.
कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सद्य स्थितीमधील आपल्या पेट्रोकेमिकल्स व्यापाराला पूर्णपणे नवे रुप दिले आहे. आज कंपनीने वीज, पेट्रोकेमिकल्स, टेक्स्टाईल, रिटेल आणि दूरसंचारसोबत अन्य क्षेत्रातही कामगिरीस प्रारंभ केला आहे. याचा लाभ म्हणूनच दिवसागणिक कंपनीचा नफा रोज नवीन आकडे प्राप्त करत असल्याचे पहावयास मिळत असून यात विदेशी गुंतवणूकदारांची मदत रिलायन्सने घेतलेली आहे.
मागील सहा वर्षानंतर जगात सर्वाधिक बदल पहावयास मिळाला आहे. त्यामध्ये गरजांप्रमाणे जगातील उद्योग क्यवसायही बदलत गेल्याची नोंद वेळोवेळी करण्यात आली आहे. तर टॉपच्या 100 कंपन्या आजही अडचणींना सामोरे जात काम करत असल्याची माहिती फ्यूचर ब्रँडच्या निर्देशांकातून देण्यात आली आहे.
रिलायन्सची वाढती लोकप्रियता
फ्यूचर ब्रँड यांच्याकडून नोंदवलेल्या निरिक्षणातून भारतामध्ये सर्वाधिक लाभदायक कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला पाहिले जात आहे. यामध्ये प्रसिद्धी सन्मान आणि नैतिकेचाही समावेश होत असून यातूनच सर्वोच्च ब्रँड म्हणून आपली ओळख कंपनीने निर्माण केली आहे. रिलायन्सकडून नवीन उत्पादन आणि ग्राहकांना चांगल्या सेवेसोबत जोडल्यानेच हे यश कंपनीला मिळवता आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









