वृत्तसंस्था / मुंबई :
लक्झरी स्मार्ट मोबाईलनिर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळख असणारी अमेरिकेची दिग्गज कंपनी ऍपल जगात बाजारमूल्यात अव्वलस्थानी राहिली आहे. सदरचे मूल्य दोन ट्रिलियन डॉलरवर पोहचले असल्याची माहिती बुधवारी मिळाली आहे. बुधवारी अमेरिकेतील शेअरबाजार सुरू होताच कंपनीने हा उच्चांकी टप्पा पार केल्याची नोंद करण्यात आली आहे.
अमेरिकी बाजारात ऍपलचे समभाग 467.77 डॉलरच्या घरात पोहोचले होते. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरवर पोहोचलेले आहेत. यासोबतच जवळपास 4.27 अब्ज समभागांचा व्यवहार झाला आहे. या प्रकारची कामगिरी ऍपलने 2 ऑगस्ट 2018 रोजी केली होती आणि पुन्हा दोन वर्षाच्या प्रवासानंतर याच महिन्यात कंपनीने नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
ऍपल कंपनीने 31 जुलै रोजी सौदी अराम्को कंपनीला पाठीमागे टाकत जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी होण्याचा मान पटकाविला आहे. सध्याच्या कालावधीत एक ट्रिलियन बाजारमूल्याच्या स्पर्धेत किंवा यादीत ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट या कंपन्यांचा समावेश राहिला आहे.









