देशातील ऑनलाईन स्टोअरचा कंपनीला लाभ : विविध क्षेत्रात मजबूत स्थिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगात तंत्रज्ञान क्षेत्रासोबत आयफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी म्हणून ऍपलची ओळख उद्योग क्षेत्रात आहे. यामध्ये ऍपल इंडियाला जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत कंपनीला महसूल कमाईत विक्रमी 64.7 अब्ज डॉलर्सचा लाभ झाल्याची माहिती आहे.
कंपनीने तिमाहीच्या दरम्यान भारतासोबत विविध बाजारांमध्ये आपली मजबूत कामगिरी केल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी दिली आहे.
भौगोलिक पातळीवर पाहिल्यास कंपनीने अमेरिका, युरोप आणि आशिया प्रशांत आदी क्षेत्रात सप्टेंबर तिमाहीच्या कामगिरीत विक्रमी उंची गाठण्यात यश मिळवलं आहे. भारतामध्येही कंपनीला अव्वल यश मिळाले असून यात ऑनलाईन स्टोअर उभारणीचा मोठा लाभ देशातून कंपनीला झाल्याचेही ऍपलने स्पष्ट केले आहे. कंपनीला एकंदर भारतात चांगला प्रतिसाद दिसतो आहे.
आयफोन विक्रीचा उच्चांक
भारतामध्ये अगोदरपासून वास्तव्यात असणाऱया सॅमसंग आणि वनप्लस यासारख्या कंपन्यांची स्पर्धात्मक तेजी खंडित करुन भारतात प्रीमियम वर्गात ऍपलने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. ऍपलने विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीने भारतात आयफोन-11 चे उत्पादन सुरु केले आहे. संशोधन कंपनी कॅनेलिसच्या माहितीनुसार भारतामधील व्यवसायावर लक्ष्य केंद्रीत केल्याने तिमाहीत कंपनीची विक्री 10 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या माहितीनुसार जवळपास आठ लाख आयफोन्सची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.









