कोरोना काळात नऊ उत्पादनकेंद्रे भारतात स्थापन, विकसीत राष्ट्रे पर्यायी उत्पादन केंद्रस्थानांच्या आहेत शोधात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील ऍपल या जगप्रसिद्ध कंपनीने आपली 9 उत्पादनकेंद्रे चीनमधून भारतात हलविण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासंबंधात भारताचे नवे धोरण अधिक अनुकूल असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कोरोना काळात घडलेल्या या घटनेने भारताचे महत्व अधिकच स्पष्टपणे अधोरेखित केले अशी तज्ञांची प्रतिक्रिया आहे.
जी उत्पादनकेंद्रे ऍपलने भारतात आणली आहेत, त्यात संगणक आणि भ्रमणध्वनीचे सुटे भाग तयार करणारी केंद्रेही असल्याने भारताचा अधिक लाभ होणार आहे. केवळ उत्पादनांची जुळणी करणारी केंद्रे भारतात आलेली नाहीत, तर प्रत्यक्ष सुटय़ा भागांचे उत्पादन करणारी ही केंद्रे असल्याने भारतात तंत्रज्ञानाची आवक झाली असून रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे.
रविशंकर प्रसाद यांचे भाषण
बेंगळूर येथे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ऍपलच्या या धोरणाची प्रशंसा केली. विकसीत देश आता त्यांच्या उच्चतांत्रिक उत्पादनांसाठी पर्यायी स्थानांच्या शोधात आहेत. भारत हे स्थान त्यांच्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरू शकते. भारत सरकारने कोरोना काळात अर्थव्यवस्था अधिकाधिक मुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले असून त्याचे लाभ आतापासूनच दिसू लागले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
इतरही कंपन्या सज्ज
आणखी काही दिवसांमध्ये भारतात इतर विदेशी कंपन्याही प्रवेश करतील व आपली उत्पादनकेंद्रे स्थापन करतील अशी चिन्हे आहेत. अमेरिकन कंपन्यांचा यात पुढाकार आहे. किमान 8 मोठय़ा अमेरिकन कंपन्या चीनमधील आपली बहुसंख्य केंद्रे भारतात आणण्याचा विचार करीत आहेत. भारत सरकारनेही त्यांना पायाभूत सुविधा आणि इतर साहाय्य करण्यासाठी पावले उचलली आहेत.
उत्पादनसंबंधी सवलत योजना
विदेशातील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना भारताकडे आकृष्ट करण्यासाठी भारत सरकारने कोरोना काळात उत्पादनसंबंधी सलवत योजना क्रियान्वित केली आहे. या योजनेनुसार अशा कंपन्यांना कर व इतर बाबींमध्ये आकर्षक सवलती घोषित करण्यात आल्या आहेत. या सोयीचा लाभ उठविण्यासाठी अनेक विदेशी कंपन्यांनी भारतात प्रवेशासाठी आवेदनपत्रे सादर केली असून या कंपन्यांना त्वरित अनुमती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 24 कंपन्यांना अशी अनुमती मिळाली आहे. आणखी 50 हून अधिक कंपन्यांची आवेदनपत्र विचाराधीन आहेत. अनुमती देण्याची प्रक्रियाही सुलभ व जलद करण्यात आल्याने विदेशी कंपन्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
ऍपलची मोठी गुंतवणूक होणार
नजीकच्या काळात भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्याची योजना ऍपलने आखली असल्याचे सांगण्यात येते. चीनमधून उत्पादनकेंद्रे हलविणे ही या योजनेची सुरवात मानली जात आहे. पुढे भारतात आणखी उत्पादन केंद्रे स्थापन करून भारतातून वस्तू इतर देशांमध्ये निर्यात करण्याचीही योजना आहे.









