अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याने केली कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) एका प्रशिक्षकाची ताबडतोब हकालपट्टी केली असून त्याची चौकशी करण्याचा आदेश बजावला आहे. साईमध्ये याआधी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून हा प्रशिक्षक काम करीत होता. नंतर त्याला प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते.
सदर आरोपी 50 वर्षावरील वयाचा असून तो ऍथलेटिक्स प्रशिक्षक आहे. पोक्सो कायद्याखाली त्याला अटक करून तिहार जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे. एका 13 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती साई पेंद्रात काम करणारी असल्याचे साईला समजले. सिरी फोर्ट संकुलाजवळ तो या मुलीला खाजगी ट्रेनिंग देत होता. ‘साई केंद्राच्या आवाराबाहेरील ठिकाणी सदर प्रशिक्षक त्या मुलीला प्रशिक्षण देत होता. त्याने संबंधित पदाधिकाऱयांची परवानगी न घेताच तिला टेनिंग देण्याचे काम स्वतःहून सुरू केले होते,’ असे साईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘या प्रशिक्षकाची पदावरून त्वरित हकालपट्टी करण्यात आली असून नियमभंग करून गैरवर्तन केल्याबद्दल त्याची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या घटनेची पोलीसानीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
साईने सांगितल्यानुसार, या प्रशिक्षकाने सेवेतील दोन करारांचे उल्लंघन केले आहे. संबंधित अधिकाऱयांची परवानगी न घेता खाजगी ट्रेनिंग घेणे आणि पोक्सो कायद्याचा भंग करणे, हे गुन्हे घडले आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीला सरकारी सेवेतून ताबडतोब निलंबित करण्यात येते. आणि जर गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येते.









