वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय ऍथलीट्सना कोरोना संदर्भात मास्कची सक्ती करण्यात आली असून सरावावेळी बॅटरीवर चालणाऱया मास्कचा वापर केला जाणार आहे. या आधुनिक मास्कची चांचणी लवकरच घेतली जाईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. ऍथलीट्ससाठी बॅटरीवर चालणारे हे मास्क आयआयटी खरगपूरच्या माजी विद्यार्थ्याने बनविले आहे.
खरगपूरच्या आयआयटीमधील पीयूष अगरवालने बॅटरीवरील मास्कचा शोध लावला आहे. अगरवालच्या स्वत:च्या मालकीची पीक्युआर टेक्नॉलाजी प्रा.लि ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे उत्पादन करण्यात येणाऱया कवच मास्क प्रोजेक्टला शासनाकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मास्कचे ब्रँड नामकरण ‘मोक्ष’ असे करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीयूष अगरवालने बॅटरीच्या मास्क उत्पादनाला प्रारंभ केला आहे. बॅटरीवर हे मास्क कार्यरत राहणार आहे. या आधुनिक मास्कची किंमत प्रत्येकी 2200 रूपये अंदाजे राहील. हे मास्क वापरणाऱया व्यक्तीला प्राणवायुचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी छोटय़ा पंख्याची सोय करण्यात आली आहे. भारतीय ऍथलीट्ससाठी यापूर्वी 1000 मास्कची ऑर्डर साईतर्फे देण्यात आली आहे. आता बॅटरीवर असलेल्या या मास्कची चांचणी येत्या 10 दिवसांमध्ये घेतली जाईल, असे सांगण्यात आले. सदर मास्कचा वापर केल्यानंतर त्या व्यक्तीला श्वसनाची कोणतीही समस्या येणार नाही आणि त्याला पुरेसा प्राणवायु उपलब्ध होईल, असे अगरवालने सांगितले आहे.









