वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी संकटामुळे सध्या देशातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना आपल्या निवासस्थानीच रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणाचा सरावही करता येत नाही. काही खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू करण्याचे ठरविले आहे. दरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) विविध केंद्रामध्ये या खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर पुन्हा प्रशिक्षण सुरू करावे, असा आदेश प्राधिकरणाने दिला आहे.
कोरोना संकटाच्या नियमावलीमुळे सध्या तरी देशामध्ये क्रीडा संघटनांतर्फे कोणतेही प्रशिक्षण सराव शिबीर घेऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया भारतीय खेळाडूंना सराव शिबीराची गरज भासत आहे. संपूर्ण देशात सुमारे दोन महिने लॉकडाऊनचा आदेश बजावण्यात आल्याने खेळाडूंना सराव करता येईना. साईच्या काही केंद्रामध्ये पुन्हा सराव सुरू करण्याची परवनागी मिळाली असून यामध्ये आरोग्य खात्याच्या नियमावलींची कडक अमलबजावणी केली जाईल. खेळाडूंना या शिबीरात दाखल व्हायचे असेल तर त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. तशी लेखी मान्यता त्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.