फौजदारी केसेससाठी होती ख्याती
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध फौजदारी वकील अलसुहेब सत्तार डिंगणकर (49) यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. सावंतवाडी येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, विवाहित बहीण, भावोजी असा परिवार आहे. ऍड. मरियम डिंगणकर यांचे ते पती, तर कुडाळ येथील प्रसिद्ध वकील, महाराष्ट्र बार असोसिएशनचे सदस्य ऍड. संग्राम देसाई यांचे मेहुणे होत.
अलसुहेब हे गेली 24 वर्षे वकिली व्यवसायात होते. वडील सत्तार डिंगणकर यांच्यासोबत त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. सावंतवाडी तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले होते. वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी मित्रपरिवार जोडला होता. ते क्रिकेटप्रेमी होते. सावंतवाडी तालुका बार असोसिएशनच्या क्रिकेट संघाची त्यांनी बांधणीही केली होती. बार असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. चांगले फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. युवा वकिलांनाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. क्राईमच्या केसेस सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता.
गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. एक चांगला मित्र व वकिली क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला मुकलो, अशा शब्दात तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पी. डी. देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.









