प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील एका महिलेविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिच्याकडून 11 लाख 66 हजार 388 रुपये किंमतीचे दागिने घेणाऱया आणि दागिने परत करण्याचे अमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध करणाऱया एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विलास उर्फ प्रवीण नामदेव कांबळे (रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रार महिला साताऱयातील असून 1 जानेवारी 2015 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत ही घटना घडली आहे. पिडीत महिलेने दि. 25 जून रोजी याबाबत तक्रार दिली असून प्रवीण कांबळे याने तिचा विश्वास संपादन करत तिच्याशी ओळख वाढवली.
त्यानंतर कांबळे याने त्या महिलेवर व तिच्या कुटुंबांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावेळी कांबळेने या महिलेकडून 11 लाख 66 हजार 368 रुपयांचे 51 तोळे वजनाचे दागिने घेतले. हे दागिने घेतल्यावर महिला परत मागू लागल्यावर तिला दागिने परत देण्याचे अमिष दाखवत महाबळेश्वर येथील पुजा लॉज तसेच संशयिताच्या घरी बोलवून तिची इच्छा नसताना तिच्याशी शारीरीक संबंध केल्याची तक्रार महिलेने दिली आहे.
तसेच महिलेकडून घेतलेले दागिनेही परत न करता कांबळे याने तिची फसवणूक केली असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी कांबळे याला 26 रोजी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे करत आहेत.








