एकास अटक : शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
भाजी व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपयांची मदत न केल्याच्या रागातून ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून शहरातील एका नागरिकाकडून तब्बल 8 लाख 40 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱया चंद्रकांत दादासो साठे उर्फ बाळू साठे ( रा. शाहू बोर्डींगजवळ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शंकर गुलाबराव निंबाळकर (रा. गडकरआळी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी व संशयित आरोपी हे दोघे कोटेश्वर मंदिरात भजन करण्यासाठी सन 2015 सालापासून जात असल्याने दोघांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर संशयिताला निंबाळकर यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती लागल्यानंतर त्याने सन 2018 मध्ये भाजी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना तीन लाख रुपये मागितले होते. त्यावर निंबाळकर यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या संशयिताने “जर तुम्ही मला तीन लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्यावर ऍट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करेन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या निंबाळकर यांनी त्याला रोख स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते.
या प्रकारामुळे मनोबल वाढलेल्या संशयिताने वेळोवेळी निंबाळकर यांना ऍट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत व त्यांच्या कुटुंबांला मारून टाकण्याची भीती दाखवून तसेच कोल्हापूर जिह्यातील करवीर पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी म्हणून वेळोवेळी 8 लाख चाळीस हजार रुपये उकळले. तसेच दि. 4 रोजी तो पुन्हा निंबाळकर यांना दोन लाख रुपयांची मागणी करत होता. त्यामुळे वैतागलेल्या निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल मोहिरे यांनी संशयिताला बेडय़ा ठोकल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.








