वृत्तसंस्था/ माद्रिद
ऍटलेटिको माद्रिदने संघर्षपूर्ण लढतीत ओसासुनाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून ला लिगा स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. लुईस सुआरेझने अंतिम टप्प्यात नोंदवलेला गोल माद्रिदसाठी निर्णायक ठरला.
ऍटलेटिकोने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले होते आणि पूर्वार्धातच त्यांनी दोनदा गोलच्या दिशेने फटके मारले. याशिवाय त्यांचे दोन गोल ऑफसाईड ठरवून फेटाळण्यात आले. 76 व्या मिनिटाला ऍटलेटिको संघ पिछाडीवर पडला. ओसासुनाच्या अँटे बुदिमिरने मारलेला जोरदार हेडर गोललाईन क्रॉस करून आत गेल्यावर जॅन ओब्लाकने तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ऍटलेटिकोने 82 व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. बदली खेळाडू रेनान लोडीने हा गोल नोंदवला. त्यानंतर सामना संपण्यास दोन मिनिटे असताना 88 व्या मिनिटाला सुआरेझने गोल क्षेत्रातून जोरदार फटका मारत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. वाढीव वेळेत ओसासुनाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या चिमी ऍव्हिलाने गोलच्या दिशेने मारलेला फटका ओब्लाकने पुढे येत रोखण्याचा प्रयत्न करताना उडालेला चेंडू नंतर दोन्ही हाताने पकडून त्यांची संधी वाया घालविली.
या विजयाने ऍटलेटिकोचे 37 सामन्यांतून 83 गुण झाले असून दुसऱया स्थानावरील रियल माद्रिदपेक्षा ते दोन गुणांनी पुढे आहेत. रियल माद्रिदनेही ऍथलेटिक बिलबावचा 1-0 असा पराभव केला. पुढील रविवारी शेवटच्या दिवशी ऍटलेटिकोची लढत रियल व्हॅलाडोलिडशी होणार आहे तर रियल माद्रिदची लढत व्हिलारेलशी होणार आहे.









