ऑल इंग्लंड बॅडमिंटन : भारताच्या लक्ष्य सेनला उपविजेतेपद
वृत्तसंस्था / बर्मिंगहम
डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर ऍक्सेलसेनच्या जबरदस्त खेळामुळे भारताच्या लक्ष्य सेनचे पहिल्यांदाच ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये जपानच्या अकाने यामागुचीने जेतेपद मिळविले.
व्हिक्टर ऍक्सेलसेनने अंतिम लढतीत 20 वर्षीय लक्ष्य सेनवर 21-10, 21-15 अशी 53 मिनिटांत मात करीत सुवर्ण पटकावले. ऍक्सेलसेनचा हा लक्ष्यवरील एकंदर पाचवा विजय आहे. लक्ष्य सेनने या स्पर्धेत सौरभ वर्मा, डेन्मार्कचा अँडर्स अँटोनसेन यांना हरवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते. या फेरीत त्याला प्रतिस्पर्ध्याकडून पुढे चाल मिळाल्याने त्याला उपांत्य फेरीत स्थान मिळाले होते. उपांत्य फेरीतही त्याने धक्कादायक निकाल देताना मलेशियाच्या ली झी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत त्याची विजयी घोडदौड ऍक्सेलसेनने रोखली. गेल्याच आठवडय़ात जर्मन ओपनमध्ये लक्ष्यने ऍक्सेलसेनला उपांत्य फेरीत हरविले होते.
यापूर्वी भारताच्या सायना नेहवालने 2015 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी तिलाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. लक्ष्य सेनला ही स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू होण्याची संधी मिळाली होती. यापूर्वी 1980 मध्ये प्रकाश पडुकोन व 2001 मध्ये पी. गोपीचंद यांनी पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य हा एकूण पाचवा (प्रकाश नाथ, 1947) भारतीय खेळाडू आहे.. अलीकडच्या कालावधीत तो बहरात असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, इंडिया ओपन सुपर 500 चे पहिले जेतेपद आणि नुकत्याच झालेल्या जर्मन ओपन स्पर्धेत त्याने उपविजेतेपद मिळविले होते.
यामागुची विजेती
महिला एकेरीत जपानच्या द्वितीय मानांकित यामागुचीने दक्षिण कोरियाच्या ऍन सेयुंगवर 21-15, 21-15 अशी 43 मिनिटांत मात करून जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी या दोघींत सहा वेळा गाठ पडली होती. त्यात दोघींनी प्रत्येकी तीनदा विजय मिळविला होता. यामागुचीचे हे कारकिर्दीतील 18 वे जेतेपद आहे.
टूरवरील नववे व सुपर 1000 स्पर्धेतील तिसरे जेतेपद आहे.
पुरुष दुहेरीत इंडेनेशियाच्या मुहम्मद शोहिबुल फिकरी-बगास मौलाना यांनी जेतेपद मिळविले तर महिला दुहेरीत जपानच्या नामी मात्सुयामा व चिहारु यांनी अजिंक्यपद मिळविले. मिश्र दुहेरीत जपानच्या युता वाटानाबे व अरिसा हिगाशिनो यांनी चीनच्या यि ल्यू व हुआंग डाँग पिंग यांच्यावर 21-19, 21-19 अशी मात करून अजिंक्यपद पटकावले. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद व त्रीसा जॉली यांना उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता.