नागपूर तरुण भारतचे मुख्य संपादक, अनेक पारितोषिके मिळविलेले पत्रकार, हिंदुत्वाचे महान भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विकासक्रमाचे साक्षीदार व सर्व सरसंघचालकांचे विश्वासू सहकारी हे बिरुद अभिमानाने मिरवणारे सर्वात ज्ये÷ स्वयंसेवक, समर्थ रामदासस्वामी म्हणतात त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा उत्कृष्ट मेळ घालणारा आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारा यशस्वी ऋषितुल्य तपस्वी, देशासाठी, संस्थेसाठी त्याग करणारा ऑल राऊंडर अशा माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने 19 डिसेबरला एका युगाचा अंत झाला आहे. या आणि अशाच आगळय़ा वेगळय़ा वैशिष्टय़ांच्या पाऊलखुणा ‘मा.गों’ चा 9 दशकांचा दीर्घ जीवनप्रवास पाहताना पदोपदी आढळून येतात.
यशस्वी पुरुषाचे भलेपण वर्णन करताना एक संत म्हणतात, ‘तो नर भला, तो नर भला, प्रपंच करोनी परमार्थ केला.’ संतांच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे परमेश्वराजवळ जाणे किंवा आत्म्याचे परमात्म्याशी मिलन असले तरी परमार्थ म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी, देशासाठी काही तरी करणे असेही लौकिकार्थाने म्हणता येईल. संत रामदासस्वामींनी प्रपंच करून परमार्थ साधणाऱयाचे सुंदर वर्णन केले आहे. रामदास स्वामी म्हणतात,
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका । येथे आळस करू नका । विवेकी हो । प्रपंच सांडून परमार्थ कराल।तेणे तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी । प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंटय़ाला। परमार्थ कैचा ।
समर्थ आधी प्रपंच नीट करायला सांगतात, मग परमार्थाकडे वळायला सांगतात. कारण ते म्हणतात की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल. कारण तुमचे लक्ष सगळे प्रपंचाकडे राहणार आहे. प्रपंचापासून दूर जाऊन परमार्थ साधणार नाही. परमार्थ सोडून प्रपंच केलात तरी तुम्ही दु:खी व्हाल. मा. गो. असेच प्रपंच आणि परमार्थ यांचा उत्कृष्ट मेळ घालत समाजोपयोगी समृद्ध जीवन जगले. कित्येक संघ स्वयंसेवक, विशेषतः प्रचारक प्रपंचापासून दूर रहात संघाचे कार्य करताना दिसतात. पण बाबुराव वैद्य याला अपवाद होते. संघकार्याकडे यत्किंचितही दुर्लक्ष न करता त्यांनी व्यवस्थित संसार केला. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचा सर्व परिवार उच्च विद्याविभूषित असून जसे डॉ. आमटे कुटुंबाने समाजसेवेचा बांधून घेतले आहे तसे वैद्य कुटुंबीयही संघाशी या ना त्या प्रकारे जोडले गेले आहे.
वर्धा जिह्यातील तरोडा गावात 11 मार्च 1923 रोजी बाबुरावांचा जन्म झाला. संघ परिवारात बाबुराव या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया वैद्य यांचे प्राथमिक शिक्षण तरोडा येथे झाले. त्यानंतरचे त्यांचे सर्व शिक्षण नागपुरात झाले. नागपुरातील डीडी-नगर विद्यालयातून 1939 साली ते मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1944 साली संस्कृत विषयातून बीएची तर 1946 साली एमएची, अशा दोन्ही परीक्षा ते प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. दोन्ही परीक्षांमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. 1946 ते 1949 या कालावधीत ते न्यू ईरा हायस्कूलमधे शिक्षक होते. त्यांनी 1966 पर्यंत हिस्लॉप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांच्याकडे नागपूरच्या दैनिक तरुण भारतची जबाबदारी आल्याने त्यांच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले. तरुण भारत वर्तमानपत्राचे मुख्य संपादक ते नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष असा त्यांचा प्रगतीचा आलेख राहिला आहे. त्यानंतर 1978 ते 1984 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यपदही भूषविले.
शिकवण्याच्या आवडीपायी त्यांनी सरकारी नोकरी सोडून कमी पगारावरील प्राध्यापकी स्वीकारली व नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात संस्कृतचे ख्यातनाम प्रोफेसर बनले. नागपूर तरुण भारतचे संस्थापक संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या उत्तराधिकाऱयाचा शोध सुरू झाला असताना श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब देवरस यांनी बाबुरावांना तरुण भारतात यायला सांगितले. संघामध्ये स्वयंसेवकाचा अधिकाऱयावर किती विश्वास असतो याचे बाबुराव हे बोलके उदाहरण ठरावे. पगार किती मिळेल वगैरे न विचारता ते हिस्लॉप कॉलेजमधील पगाराच्या अर्ध्या पगारावर रुजू झाले. बाबुरावांनी होकार देतानाच स्वत:ची म्हणून एक अट टाकली होती. ती म्हणजे मी एकदम संपादक म्हणून रुजू होणार नाही, तर उपसंपादक म्हणून कामाला सुरुवात करीन, तर पगाराबाबत बाळासाहेबांनी आश्वासन दिले होते की बाबुरावांना पगार कमी पडला तर स्वतःच्या शेतातून येणाऱया खाजगी उत्पन्नातून पैसे देईन. अर्थात बाबुरावांना तशी गरज पडली नाही. बाबुराव आपल्या उपजत गुणांमुळे एकेक काम शिकत मुख्य संपादक झाले. मुख्य संपादक या नात्याने त्यांनी संघविचार सर्व वाचकात रुजवला, पण सर्व वैचारिक प्रवाहांना तरुण भारतात स्थान मिळेल याची काळजी घेतली. या कालखंडात ते ‘नीरद’ या नावाने लिहीत असत. वयाची 60 वर्षे पूर्ण होताच ते मुख्य संपादक पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ‘भाष्य’ हा अतिशय लोकप्रिय साप्ताहिक स्तंभ लिहिणे सुरू केले. मुख्य संपादक म्हणून निवृत्त झाल्यावर ते नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक व नंतर अध्यक्षही झाले. आणीबाणीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. स्थानबद्धतेच्या काळातही तेच तरुण भारतचे संपादक, मुद्रक व प्रकाशक होते. आणीबाणी उठताच त्यांनी संपूर्ण विदर्भात प्रवास करून श्री नरकेसरी प्रकाशनासाठी पैसा उभा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. तरुण भारतचे किमान 5 शेअर विकल्याविना जेवायचे नाही हा त्यांचा त्यावेळी संकल्प होता. त्यामुळे तरुण भारत नव्या स्वरूपात येण्याचा मार्ग मोकळा झाला. 2010 पर्यंत म्हणजे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षापर्यंत तरुण भारतमध्ये ते लेखन करीत होते. निवृत्तीनंतर बरीच वर्ष ते नागपुरातील संघ कार्यालयात मुक्कामाला गेले होते. रा. स्व. संघाचे ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. नंतर संघाचे पहिले प्रवक्ते झाले. मा.गों.ना वयाची शंभरी पूर्ण करण्याची खूप प्रबळ इच्छा होती. ते आशीर्वाद देताना, इतरांना सांगत की, ‘अमुक इतक्मया दिवसांनी मी शंभरी पूर्ण करणार आहे. तोवर तुमची प्रकृती ठीक ठेवा.’ आताही कोविडवर यशस्वी मात करून परतल्यावर त्यांनी आपल्या मृत्युसख्याला जवळ केले. जाता जाता वयाच्या 98 व्या वषीही कोरोनावर मात करता येते हा महत्त्वपूर्ण संदेश देऊन त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. अशा थोर देशभक्त, धर्मभक्त महात्म्याला भावपूर्ण आदरांजली.
– विलास पंढरी








