किमान आधारभूत किंमत वाढविली जाणे शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज बुधवारी होणार असून त्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऊस व साखरेच्या किमान आधारभूत मूल्यांमध्ये वाढ केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी व साखर कारखाने यांना साहाय्य व्हावे यासाठी काही योजना आखल्या जात आहेत, असे सांगण्यात येत आहे. परिणामी उत्सुकता ताणली गेली आहे.
गेल्यावर्षी ऊस आणि त्यामुळे साखरेचे उत्पादन जास्त झाले. त्यामुळे साखरेचा दर काही काळासाठी पडला होता. यंदाही उसाच्या लागवडींखालील जमिनीत वाढ झाल्याचे समजते. अशा स्थितीत साखरेचे आणि उसाचे दर पडू नयेत, अशी मागणी संबंधितांकडून केली जात होती. ती पूर्ण करण्याच्या दिशेने केंद्राची पावले पडतील अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र दर किती प्रमाणात वाढणार हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. अद्याप सरकारने दरवाढीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण निर्णय होईल असे सूत्रांचे ठाम म्हणणे आहे.
शेतकऱयाला उत्सुकता
बैठकीत दर किती प्रमाणात वाढविण्याचा निर्णय होईल याकडे देशातील, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातींल शेतकऱयांचे लक्ष आहे. याच तीन राज्यांमध्ये साखर कारखानेही देशात सर्वात जास्त प्रमाणात आहेत. साखरेची आधारभूत रक्कम किलोमागे किमान 50 पैसे वाढविण्याची मागणी आहे.









