वाळवा / वार्ताहर
गेल्या अनेक वर्षांपासून साखर कारखान्याकडे ऊस तोडणी करणारे तोडणी मजुर टोळ्यांचे मुकादम हे ऊस वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराला प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांना गंडा घालतात, साखर उद्योग उद्योगांमुळे अनेकांना रोजगार मिळतात आणि ग्रामीण भागांमध्ये साखर कारखाना परिसरांमध्ये, ग्रामीण भागाला आर्थिक नवचैतन्य येते. परंतु, मुकादम पोबारा करीत असल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांची लाखो रुपयांची फसवणुक होत आहे.
ही फसवणुक थांबण्यासाठी सरकारने काहीतरी सकारात्मक धोरण आखले पाहिजे आणि अशा फसवणूक करणाऱ्या मुकादमांना त्यांच्याकडून पैसे वसूल करून व ट्रॅक्टर – ट्रक ऊस वाहतूकदार – कंत्राटदारांना न्याय दिला पाहिजे, यासाठी हुतात्मा साखर कारखान्याचे जवळपास पन्नास ते साठ ऊस वाहतूक कंत्राटदार यांन याबाबत पन्नास ते साठ ऊस तोडणी कंत्राटदार वाहतूकदार यांनी निवासी जिल्हाधिकारी सांगली मौसमी बर्डेयांच्याकडे निवेदन दिले आहे.
या फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करून तोडणी वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना न्याय मिळावा अशी, अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना शिरगाव येथील वाहतूकदार दिलीप शिंदे म्हणाले साखर उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळतो, ग्रामीण भागात नवचैतन्य येते, असे असले तरी अलीकडील काळामध्ये बीड, उस्मानाबाद भागातून ऊस मुजरांचा पुरवठा करतो म्हणून ऊसतोडणी मुकादम वाहतूक कंत्राटदार ट्रक ट्रॅक्टर चालक मालक यांच्याकडून लाखो रुपये घेऊन पोबारा करतात, साखर कारखाने चालू होऊन दोन-तीन महिने झाले तरी कराराप्रमाणे मुकादमांनी कामगारांचा पुरवठा केलेला नाही.
ते त्यांच्या मुळ राहत्या घरी, ठिकाणावर कधीच सापडत नाहीत, त्यांचा फोन लागत नाही, फोन लागला तर ते फोन उचलत नाहीत, वाहतूकदार तोडणी कंत्राटदारांना चुना लावण्याचे काम ते करत आहेत, या मुकादमांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाळवा येथील ऊस वाहतूक कंत्राटदार ट्रक – ट्रॅक्टर चालक मालक यांनी केली आहे. येडेनिपाणीचे कंत्राटदार सुभाष शिंदे, शिरगावचे दिलीप शिंदे, बजरंग कुशिरे आष्टा, दिलावर लाडखान, महादेव अहिर, रवींद्र भोकरे, आनंदराव डवंग, मुरलीधर देसाई रा. वाळवा म्हणाले ऊस वाहतूकदार कंत्राटदार ट्रॅक्टर चालक मालक यांनी बँकेची कर्ज काढून हा व्यवसाय करण्यासाठी फंड उभा करतात, हा फंड हातोहात लंपास झाल्यामुळे बँकांची कर्जे कशी भागवायची ? हा प्रश्न या ऊस वाहतूक कंत्राटदार यांच्या समोर उभा आहे.
परिणामी ही वाहतूकदार कंत्राटी कुटुंबे अडचणीत आली आहेत, बँकेची कर्जे भागवायची कशी ? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, अनेक वर्षे हा प्रकार चालला असून घरे, वाहने, शेती, जनावरे विक्री करून या वाहतूकदार कंत्राटदारांनी आतापर्यंत कर्जे भागवली आहेत, या फसवणुकीचा प्रकारामुळे ही कुटुंबे देशोधडीला लागणार असून, शासनाने व पोलीस खात्याने, प्रशासनाने कठोर भूमिका घेत अशा मुकादमाला ताब्यात घेऊन ऊस वाहतूक कंत्राटदारांना त्यांचे पैसे परत देणे गरजेचे आहे, याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीतकुमार गेडाम यांनाही निवेदन दिले आहे. यावर जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख काय भुमिका घेतात याकडे ऊस वाहतूकदार कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे.








