एम. के. हुबळी साखर कारखान्याकडून बिले थकल्याने घेतला निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
ऊस बिलाचा तिढा जुनाच आहे. बेळगाव जिह्यातील अनेक साखर कारखान्यांनी कोटय़ावधी रुपयांची बिले थकविली आहेत. एम. के. हुबळी येथील एका शेतकऱयाने ऊस बिलासाठी स्वतःची समाधी स्वतःच खोदून वेगळय़ा पध्दतीने राज्याचे लक्ष वेधले आहे. बिले तर नाहीत किमान मुठभर माती घालायला तरी या, असे भावनिक आवाहन या शेतकऱयाने कारखान्याला केले आहे.
या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. शिवानंद बोगार असे त्या शेतकऱ्याचे नाव असून सोशल मीडीयावर समाधीचे व्हिडीओ व्हायरल होताच सरकारी यंत्रणेलाही खडबडून जाग आली आहे. एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याने आपली बिले थकविल्याचा आरोप करीत हा शेतकरी समाधीत बसला होता.
शिवानंद या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 114 टन ऊस त्याने एम. के. हुबळी साखर कारखान्याला पाठविले होते. अद्याप 85 हजार रुपये बिल यायचे आहे. 15 ते 20 वेळा चकरा कापूनही कारखान्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या या शेतकऱयाने समाधीची शक्कल लढवून लक्षवेधून घेतले आहे.
एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला दफन करण्यासाठी लागणाऱया आकाराचा खड्डा तयार करुन स्वतः त्या खड्डय़ात बसून कारखानदारांना जाब विचारतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. आपण 15 ते 20 वेळा चकरा कापलो तरी 85 हजार रुपये बिलमिळत नाही. फाटलेली लुंगी घेण्यासाठीही आपल्या जवळ पैसे नाहीत. बिले तर नाहीत किमान संचालकांनी मुठभर माती घालण्यासाठी तरी यावे, असे आवाहन करीत या शेतकऱयाने संचालकांची खिल्ली उडविली आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.