पुलाची शिरोली / वार्ताहर
पूर्ववैमनस्यातील वादातून शिये येथील १० गुंठे ऊस पेटवून आर्थिक नुकसान केल्याबद्दल माजी सरपंच बाबासो रामचंद्र जाधव (रा. हनुमाननगर,शिये ) यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अरुण भगवान जाधव (वय ४७ रा. शिये) यांनी फिर्याद दिली आहे.
अरुण जाधव यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, हनुमाननगर, शिये येथे मी आई, वडील, पत्नी, मुले असे एकत्र राहतो. शिये ग्रामपंचायत हद्दीतील २८३ या जमीनीत काही लोकांनी अतिक्रमण करून जागा बळकावून बंगले बांधले आहेत. याबाबत मी न्यायालयात दाद मागितली असून हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणी आमच्या भाऊबंदकीतील माजी सरपंच बाबासो जाधव यांना वकीलामार्फत नोटीस आल्यामुळे या रागातून त्यांनी १३ डिसेंबर रोजी शिये येथील आमचा १० गुंठे जमीनीतील ऊस पेटवून दिला.
आमचे आर्थिक नुकसान करण्यासाठी व मी न्यायालयात दावा केल्याच्या रागातून बाबासो जाधव यांनी हे कृत्य केले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. शिरोली एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.