प्रतिनिधी / सांगली
ऊस तोडणीसाठी कोणतेही कारण सांगून वाहतुकदार, मुकादम आणि तोडणी मजूर यांच्याकडून पैशाची मागणी झाली तर शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करावी असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना केले आहे. याबाबत कारखान्यांनीही तक्रार निवारण अधिकारी नेमून असे प्रकार रोखावेत असे परिपत्रकही त्यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना काल, सोमवारी (दि.11) जारी केले आहे.
प्रत्येक वर्षी ऊस हंगामामध्ये आपल्या ऊसाची वेळेत तोडणी व्हावी यासाठी शेतकरी धडपडत असतात. त्याचा गैरफायदा घेऊन ऊस लहान आहे, पडलाय अशी तक्रार करत काही मंडळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करतात. याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारीची गंभीर दखल साखर आयुक्तांनी घेतली आहे.
येत्या गळीत हंगामात अशी पैशाची मागणी झाली तर shetkari.madat@gmail.com या ई-मेल वर शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारीत मजुर, मुकादम, वाहतूकदार यांचे नाव आणि वाहन क्रमांक नमूद करावे असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
याबाबत एक परिपत्रक सोमवारी सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनाही रवाना करण्यात आले असून त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा, अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होणार नाही यासाठी संबंधितांना सूचना कराव्यात. त्यातूनही पैसे घेतले गेले असल्यास ते तात्काळ संबंधितांच्या बिलातून कापून शेतकऱ्याला परत करण्यात यावेत. अन्यथा या कार्यालयाकडे तक्रार आली तर गंभीर कारवाई करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.
Previous Articleस्कर्टची निवड करताना
Next Article सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ शंभरच्या खाली








