ऑनलाईन टीम / बीड :
ऊसतोडणी करून बीड जिल्ह्यात परतलेल्या आणि सुरक्षेसाठी 28 दिवस स्वतःला घरातच होम क्वारंटाईन करणाऱ्या ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून यासाठी प्राथमिक स्वरूपात 1 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांना बीडमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 28 दिवस क्वारंटाईनकरण्यात येणार आहे. या क्वारंटाईन कालावधीत ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची जीवनावश्यक वस्तूंसाठी परवड होऊ नये म्हणूनबीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात 1 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.
या निर्णयानुसार ऊसतोड मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे.









