जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लसीकरण करुन घेण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन केले जात आहे. मात्र समाजात असेही काही घटक आहेत, ज्यांच्यापर्यंत हे आवाहन पोहचत नाही. ऊसतोडणीसाठी जिल्हय़ात आलेले ऊसतोड मजूर लसीकरणापासून दूर आहेत. त्यांच्यासह लसीकरणापासून वंचित असणाऱया घटकांच्या लसीकरणासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी सुनियोजित कार्यक्रम आखण्यात यावा, अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, जिल्हय़ात साखर हंगाम सुरु असल्याने ऊस तोडणीसाठी परजिल्हा आणि राज्यातून ऊसतोडणी मजूर दाखल झाले आहेत. कारखान्यांच्या आवारात ते पाल मारुन राहतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन साखर हंगामात ते आपले गावं, घर सोडून रोजगारासाठी स्थलांतरीत होतात. यापैकी कित्येक मजूंरांकडे मोबाईल, टिव्ही अशी प्रसारणांची साधने नाहिती. त्यामुळे बहुतांश ऊसतोड मजुरांना लसीकरणाबाबत माहितीच नाही आहे. अशा घटकामध्ये सध्या कोरोना आणि त्यावरील उपाययोजना याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
यासाठी साखर कारखान्यांच्या क्षेत्रात वास्तव्यास असणाऱया ऊस तोड मजुरांसाठी प्रशासनाने लसीकरण शिबिर घ्यावे. जेणेकरुन लसीकरणापासून दूर असणारे हे मजूरही लस घेवून कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहतील. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही त्यांना यावेळी माहिती देण्यात यावी. साखर निर्मितीच्या प्रक्रीयेमध्ये मजूरांची भुमिका महत्त्वाची आहे. ऊसतोड मजूरच नसतील तर साखर उद्योग ठप्प होईल. त्यामुळे या मजूरांचा प्रंट लाईन वर्कर्समध्ये समावेश करुन ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना बुस्टर डोस देण्याचे नियोजनही प्रशासनाने करावे, अशही मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी निवेदनात केली आहे.