संपावर जाण्याचा संघर्ष समिती व कृती समितीचा निर्णय
औंध / वार्ताहर :
संघर्ष समितीमध्ये सहभागी २७ संघटना तसेच एका संघटनेने दिलेले समर्थन व कंत्राटी कामगारांमध्ये कार्यरत असलेल्या १२ संघटना व ८ कंत्राटी कामगारांच्या संघटनांनी संपाला समर्थन दिले आहे. चर्चेत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. लेखी करार ऊर्जा सचिव यांनी केला नसल्याने संघर्ष समिती व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत व्यापक चर्चा झाली. एकमताने २८ व २९ मार्चचा संप यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येऊन दिड महिन्यापूर्वी संपाची नोटीस देऊन सुद्धा प्रशासनाने संपाच्या ३ दिवस अगोदर चर्चा करण्यास आज कामगार संघटनाना पाचारण केले.संघर्ष समिती व कृती समितीच्या नेतृत्वाने अत्यंत आक्रमक पणे व प्रभावीपणे महाराष्ट्रातील वीज उघोगातील कंपन्यातील कामगारांच्या भावना तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनापुढे मांडल्या.
प्रशासनाने धोरणात्मक मागण्याबाबत सुद्धा करू, पाहू, बघू, सल्ला घेऊ अशा पद्धतीची थातूरमातूर उत्तरे दिली. प्रशासनाने संघटनांनी संप करु नये म्हणून सोपस्कार पूर्ण करण्यासाठी बैठक घेतली. त्यामुळे संघर्ष समिती व कृती समितीचे पदाधिकारी यांनी प्रशासनाच्या भूमिकेमुळे निषेध करण्यात आला. एकमताने २८ व २९ मार्चचा संप यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.