वार्ताहर/ मानकापूर
माणकापूर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मलकारसिद्ध मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. मंदिर परिसरात राज्य सरकारने विविध प्रकारची झाडांची लागवड केली असून ज्याठिकाणी झाडे जगलेली नाहीत, अशा ठिकाणी ऊर्जा फाऊंडेशनच्या वतीने जंगली झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी बोलताना डॉ. शांतिकुमार पाटील यांनी, माणसाला शुद्ध हवा मिळणे मुश्कील झाले असून सध्याच्या वातावरणात प्राणवायूचे महत्व जगाला कळले आहे. त्यामुळे आपण गावातील नागरिक एकत्र येऊन झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम राबूया व हा परिसर ऑक्सिजन पार्क म्हणून निर्माण करूया, असे सांगितले.
प्रवीण निंगणूरे, यांनी 5 जून ते पुढील 5 जूनपर्यंत एक हजार झाडे लावण्याचा फाऊंडेशनचा मानस असून ऊर्जा फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्यांनी आपल्या वाढदिनी 11 झाडे लावावीत. असे सांगून याची सुरुवात मी स्वतः पासून करीत असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊनच्या काळात रिकाम्या वेळेचा चांगला सदुपयोग व्हावा यासाठी ऊर्जा फाऊंडेशनने बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहनही निंगणूरे यांनी केले. सदर कार्यक्रमास विजय माळी, काकसो पाटील, डॉ. गिरीजाशंकर माने, प्रकाश आरगे (प्रगतशील शेतकरी), अनिल आरगे (ग्रा.प.सदस्य), राहूल वराळे,रणजित बत्ते, अमर पाटील उपस्थित होते. शेवटी आभार महावीर चौगुले यांनी व्यक्त केले.









