ताकारी योजना सुरू करण्याची मागणी
देवराष्ट्रे / वार्ताहर
ऊन्हाचा कडाका वाढल्याने पाणीपातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. विहीरी व बोअरवेल्सनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन ताकारी योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यातुन होत आहे.
ताकारी योजनेच्या माध्यमातुन कडेगाव, पलुस, तासगाव, वाळवा तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा होतो. योजनेमुळे 16 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
गत पंधरा दिवसापासुन ऊष्मा प्रचंड वाढला आहे. बागायती पिकांना पाण्याची गरज भासत आहे. तर ऊस पिकासाठीही पाण्याचा प्रचंड ऊपसा होत आहे. ऊन्हाच्या कडाक्याने हलक्या जमिनीतील पिके वाळु लागली आहेत. विहीर, बोअरवेल यांची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. योजनेवर काही गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही अवलंबुन आहेत. योजनेचा मुख्य कालवा तब्बल 144 किमीचा आहे. त्यामुळे आवर्तन सुरु झाल्यानंतरही सर्वत्र पाणी फिरण्यास बराच कालावधी जाणार आहे. आवर्तन लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीचाही प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे योजना लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.









