हेड, कॅरे यांची अर्धशतके, ऑस्ट्रेलिया 5 बाद 311
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजाचे नाबाद शतक तसेच हेड आणि कॅरे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 बाद 311 धावा जमवल्या. उस्मान ख्वाजा 126 तर कॅरे 52 धावांवर खेळत आहेत. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 82 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडतर्फे ब्रॉड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 तर स्टोक्सने एक गडी बाद केला.
या कसोटीत यजमान इंग्लंडने शुक्रवारी खेळाच्या पहिल्या दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 393 धावावर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात 4 षटकात बिनबाद 14 धावा जमवल्या होत्या. इंग्लंडच्या डावामध्ये जो रुटचे नाबाद शतक तसेच क्रॉले आणि बेअरस्टो यांची अर्धशतके वैशिष्ट्यो ठरली.
ऑस्ट्रेलियाने बिनबाद 14 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ केला पण इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि कर्णधार स्टोक्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केल्याने ऑस्ट्रेलियाला उपाहारावेळी बॅकफूटवर जावे लागले. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 31 षटकात 3 बाद 78 अशी होती. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या एकाच षटकातील सलग दोन चेंडूवर डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशेन यांना तंबूचा रस्ता दाखवला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी 11 व्या षटकातच ब्रॉडने ऑस्ट्रेलियाला हा धक्का दिला. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात सलामीचा वॉर्नर त्रिफळाचित झाला. त्याने 27 चेंडूत 2 चौकारांसह 9 धावा जमवल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला लाबुशेन ब्रॉडच्या चेंडूवर यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. लाबुशेनला आपले खातेही उघडता आले नाही. ख्वाजा आणि स्मिथ यांनी सावध फलंदाजी केली. इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 20.4 षटकात फलकावर लागले. उपाहारापूर्वीच ऑस्ट्रेलियाने आणखी एक महत्त्वाचा गडी गमवला. कर्णधार स्ट्रोक्सच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. त्याने 59 चेंडूत 16 धावा जमवल्या. उपाहारावेळी ख्वाजा 40 तर हेड 8 धावांवर खेळत होते.
उपाहारानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला आणि सलामीच्या ख्वजाने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 106 चेंडूत झळकवले. ऑस्ट्रेलियाचे शतक 37.2 षटकात फलकावर लागले. हेड आणि ख्वाजा यांनी एकेरी आणि दुहेरी धावावर भर देत धावफलक हलता राखला. या जोडीने चौथ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी 83 चेंडूत पूर्ण केली. ट्रेविस हेडने आत्मविश्वासाने फलंदाजी करत 63 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 धावा जमवताना ख्वाजासमवेत चौथ्या गड्यासाठी 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर हेड मोईन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इंग्लंडची यावेळी स्थिती 45.3 षटकात 4 बाद 148 अशी होती. ऑस्ट्रेलियाचे दीडशतक 47.1 षटकात फलकावर लागले. एका बाजूने उस्मान ख्वाजा शांतपणे फलंदाजी करत होता. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 61 षटकात 4 बाद 188 धावा जमवल्या. ख्वाजा 2 षटकार आणि 9 चौकारांसह 84 तर ग्रीन 2 चौकारांसह 21 धावावर खेळत आहेत. या जोडीने पाचव्या गड्यासाठी चहापानापर्यंत 40 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चहापानावेळी अद्याप 205 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत.
ख्वाजाचे शानदार शतक
चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने 123 धावांची भर घालताना एकमेव गडी गमवला. या सत्रामध्ये उस्मान ख्वाजाने आपले कसोटीतील 15 वे शतक झळकवले. ख्वाजा आणि ग्रीन यांनी पाचव्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. मोईन अलीने ग्रीनचा त्रिफळा उडवला. त्याने 68 चेंडुत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 38 धावा जमवल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर ख्वाजाला कॅरेने भक्कम साथ दिली. कॅरेने कसोटीतील आपले पाचवे अर्धशतक झळकवले. रुटकडून त्याला जीवदान मिळाले. ख्वाजा 219 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 126 तर कॅरे 80 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे ब्रॉड व मोईन अली यांनी प्रत्येकी दोन आणि स्टोक्सने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 8 बाद 393 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया प. डाव 94 षटकात 5 बाद 311 (वॉर्नर 2 चौकारांसह 9, ख्वाजा 279 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 126 धावांवर खेळत आहे, लाबुशेन 0, स्टिव्ह स्मिथ 16, हेड 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50, ग्रीन 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 38, कॅरे 80 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहे, अवांतर 20, स्टुअर्ट ब्रॉड 2-49, मोईन अली 2-124, स्टोक्स 1-33).