प्रतिनिधी / उस्मानाबाद
भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या महाआरतीने पीक विमा आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
खरीप हंगामात उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांच अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरुन देखील या पिकांच्या नुकसानीपोटी पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आल्या. वास्तविक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या कृषी विभागाने पाठवल्या वरून शेतकऱ्यांना मदतही दिली. हेच कृषी विभागाचे पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा भरपाई द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले कि, पीक विम्याचे ४५० कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा झालेले असताना देखील कंपनीने फक्त ७० ते ८० कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आणि बाकीचे पैसे घशात घातले. सरकारने अशा नफेखोरी कडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि शेतकरी राजाला त्याच्या हक्काची विम्याची रक्कम देय करावी. बोलत असताना त्यांनी असेही सांगितले कि ही मदत, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर नाही भेटली तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
हे आंदोलन साखळी पद्धतीने २२ फेब्रुवारी पर्यंत चालवले जाणार आहे. जोपर्यंत पीक विमा कंपनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या खरीप पिकांच्या भरपाईपोटी नुकसानीची रक्कम देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारचा निषेध करून, पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी आग्रही मागणी केली. या धरणे आंदोलनात भाजपा जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.