प्रतिनिधी / उस्मानाबाद
पुरात वाहून गेलेल्या दोघां युवकापैकी एकाचा मृतदेह सापडला. कनगरा येथील समीर युन्नूस शेख ( वय 27 ) असे या युवकाचे नाव आहे. शेख यांचा मृतदेह बोरखेडा येथे आज सकाळी हाती लागला असल्याची माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.
उस्मानाबाद तालुक्यात 9 जुलै रोजी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे तालुक्यातील बोरखेडा व समुद्रवाणी येथील ओढ्यांना पूर आला होता. या पुरात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनास यश आले होते. तर, वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहून गेलेल्या दोघांचा शोध लागला नव्हता परंतु त्या दोघांपैकी बोरखेडा येथे कनगरा येथील समीर युन्नूस शेख यांचा शोध लागला आहे. शेख यांचा मृतदेह बोरखेडा येथे आज सकाळी सापडला.
9 जुलैच्या रात्री पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश आले होते. तर दोघे वाहून गेले होते. त्यांचा महसूल प्रशासन, ग्रामस्थ, अग्निशमन दल शोध घेत होते. समुद्रवाणी येथे वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा अजून शोध सुरू आहे.










