जनसामान्यांना केंद्र मानून आरोग्य सेवा द्यावी – डॉ. विजयकुमार फड
प्रतिनिधी / उस्मानाबाद
आपण वैद्यकीय क्षेत्रात आरोग्य सेवा देत असतो. आपणांस मिळालेली संधी समजून आणि जनसामान्यांना आपल्या सेवेचा केंद्रबिंदू मानून आरोग्य सेवा देण्यात यावी. आपण शासनाचे जनसेवक आहोत. गरीबातील गरीब व्यक्तीला आरोग्य सेवा देण्यास बांधिल आहोत. जनसामान्य व्यक्तीला सेवेचा लाभ मिळाल्यास डॉक्टर आणि रुग्णांचे असे नाते घट्ट होते. तसेच आरोग्य संस्था आणि परिसर स्वच्छ ठेवावा, संस्थेच्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या प्रशिक्षण कार्यशाळेत काल येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम जिल्ह्यात दि. 17 जानेवारी 2021 रोजी राबविण्यात येणार आहे.या मोहिमेची जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आणि आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ.अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असून त्यासाठी गाव, वाड्या, वस्त्या या ठिकाणी बुथची स्थापना करण्यात आली आहे. बुथ वरील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविड-19 अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जास्तीत जास्त बालकांना पोलिओ लस देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे यांनी यावेळी सूचना दिल्या.
या कार्यशाळेस प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के.मिटकरी, वैद्यकीय अधिकारी ( बाह्य संपर्क ) डॉ.सचिन बोडके,कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ.रफिक अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर.पांचाळ,जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन परळीकर, डॉ.राजेश कुकडे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.