प्रतिनिधी / उस्मानाबाद
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती,शाश्वत सिंचन व नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प केवळ महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी घेवून केंद्राकडे शिफारस केली नसल्याने रखडले असून तेरणा व तुळजाभवानी कारखाने या हंगामात चालू असते परंतु याला देखील सरकारची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचे सांगत या महत्वाच्या प्रश्नांवर १५ डिसेंबरपर्यंत बैठक घेतली नाही. तर मंत्र्यांना जिल्हा बंदी करण्यात येईल असा इशारा आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी वर्षभरापासून प्रमुख विषयांची प्रगती शून्य आहे व त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असून सरकार उस्मानाबाद जिल्ह्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने आता कोविडच्या आडुन आपले अपयश झाकणे आता बंद करावे व उस्मानाबाद जिल्ह्याला देण्यात येणारी सापत्न वागणुक थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असल्याने, जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती,सिंचनाची सुविधा,अत्याधुनिक आरोग्य सुविधा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,टेक्निकल टेक्सटाईल पार्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग हे विषय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी न ठेवल्याने व केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्याने रखडले असून जिल्हा बँकेची शासनाकडे थकीत रक्कमेपैकी केवळ १० % रक्कम उपलब्ध करून दिली असती तर तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाने या हंगामात चालू झाले असते असे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ , जिल्हयात उद्योग आकर्षीत करण्यासाठीचे ‘कथीत’धोरण, ‘पुढील कॅबीनेटला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करु’ यासह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मदत करू या सत्ताधाऱ्यांनी जिल्हावासीयांना दिलेल्या आश्वासनांच पुढे काय झालं ? कि ते केवळ बातमी देण्यासाठी केलेले फार्स होते ? असा प्रश्न विचारत त्यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत त्यांना चिमटा काढला आहे.
जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे अनेक वेळा निवेदन केले आहे.मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आता निर्वाणीचा इशारा म्हणून १५ डिसेंबर पर्यंत या विषयाबाबत बैठक लावुन ते विषय मार्गी लावण्यासाठी कालबध्द कार्यक्रम जाहीर करा अन्यथा राज्य सरकार मधील मंत्र्याना जिल्ह्यात येण्याचा आता नैतिक अधिकार उरला नाही असे मानुन उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करु देणार नाही असा इशारा आ.पाटील यांनी दिला आहे.