कोविड प्रतिबंधात्मक योजनाच्या अंमलबजावणीस नागरिकांनी सहकार्य करावे : कौस्तुभ दिवेगावकर
प्रतिनिधी / उस्मानाबाद
कोविडच्या रुग्णांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्ष्यात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्युला आज उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या जनता कर्फ्युची शहरातील विविध भागास भेट देऊन त्यांनी सकाळी दहा वाजता पाहणीही केली.
दरम्यान, कोविडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाय योजनाना राबवण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. शहरातील शिवाजी महाराज चौक ते खाजा नगर, नेहरू चौक, काळा मारुती चौक, बार्शी नाका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते पुन्हा शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी दिवेगावकर यांनी या जनता कर्फ्युची पाहणी केली.
कोविडला घालवण्यासाठी जनतेने कोविडच्या लक्षणं दिसताच कोविड चाचणी करून घ्यावी, अंगावर आजारपण काढू नये. त्यामुळे आजार बळावून त्याची संपर्कात अलेल्याना लागण होऊन या साथीच्या रुग्णांची संख्या वाढू शकते. नागरिकांनी कोविड लस घेण्यासाठीही प्रतिसाद द्यावा. त्यासाठी लस देण्याच्या केंद्रात वाढ केली आहे त्याचसोबत सत्रही वाढवले आहेत. ही लस आता शहरातील शासकीय रुग्णालय, ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे तसेच काही खाजगी रुग्णालयातही माफक किमतीत घेता येते तेव्हा रीतसर नोंद करून किंवा प्रत्यक्ष केंद्रात जाऊन लस घ्यावी असेही आवाहन दिवेगावकर यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, नगरपालिकेचे मुख्यधिकारी हरोकल्यान येलगट्टे, श्री. बुधवंत, आनंदनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चव्हाण आदी उपस्थित होते.