प्रतिनिधी/ उस्मानाबाद
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने 4 हजार 670 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणी करण्यात येणार असून, त्यापैकी 3 हजार 795 जणांच्या तपासणीत 52 शिक्षकांना कोरोनाने विळखा घातल्याचा अहवाल समोर आला आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार नाही. मात्र संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात येणार असून, पालकांनी होकार दिला तरच त्यांना शाळेत शिकवले जाईल. तसेच नकार दिला तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोमवारी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, शाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शिक्षक व कर्मचाऱयांच्या कोरोना चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी चाचणी सुरू असून, अनेक शिक्षकांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जर या शिक्षकांनाच कोरोनाची बाधा होत असेल तर विद्यार्थ्यांचे काय ? हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
उस्मानाबादमधील भोसले हायस्कूलमधील 22 पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी, तर उमरग्यातील महात्मा बसवेश्वर शाळेतील सहा शिक्षक बाधित आहेत. याशिवाय इतर शाळांमधील शिक्षकही पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिक्षकांमध्ये देखील थंडी, ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे दिसून येत असल्याने पालक व शिक्षकांमधून भीती व्यक्त होत आहे.








