मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला वेबिनावर संवाद
प्रतिनिधी / उस्मानाबाद
मुंबईत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता दिल्यानंतर यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज संबंधित विभागांचे मंत्री, सचिव आणि लोकप्रतिनिधींसोबत वेबिनारद्वारे संवाद साधून या महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. राज्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे धोरण लवकरच ठरवू, असेही ते म्हणाले.
आज सायंकाळी झालेल्या या वेबिनार संवादामध्ये मंत्रालयातून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील हेही या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथील नव्याने स्थापन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यासाठी येत्या सोमवारी वैद्यकीय शिक्षणाचे प्रधान सचिव आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी सामंजस्य कराराची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन प्रस्ताव सादर करावा. आता सरकारने या दोन्हीही जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याच्या कार्यान्वयाची पूर्तता प्रशासनाने जबाबदारीने पूर्ण करावी, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे संबंधित अधिकाऱ्यांना दिले.