प्रतिनिधी/ उंब्रज
कराड तालुक्यातील वनवासमाची येथील शिवारात उसाच्या शेतात नुकतेच डोळे उघडलेले बिबटय़ाचे तीन बछडे आढळून आलीत. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ऊस तोड कामगारांना ही बछडी निदर्शनास आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शेतकऱयांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व वन्यजीव रक्षक टीम, पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ट्रप कॅमेरे लावण्याचे काम सुरू होते.
वनवासमाची येथे शिवारात मागील दहा वर्षांपासून बिबटय़ाचा वावर आहे. अनेकदा ग्रामस्थांना बिबटय़ाचे दर्शन झाल आहे. चार वर्षांपूर्वी झाडांवरुन गेलेल्या वीज वाहक तारामध्ये अडकून बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. तसेच डोंगर पायथ्याशी एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला होता. दरम्यान, सोमवारी वनवासमाचीतील महादेव मंदिराच्या दक्षिणेस धर्मेश्वर मंदिर परिसरात असणाऱया शिवारात ऊस तोडणी सुरू असताना बिबटय़ाची तीन बछडी ऊस तोड कामगार दिसून आली. ऊस तोड कामगार घाबरून गेले. तिन्ही बछडी एकमेकांना बिलगून बसली होती. याबाबत काही शेतकऱयांनी वनविभागास माहिती कळविली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, दिपाली अवघडे, प्राणीमित्र योगेश शिंगण, रोहित कुलकर्णी, अजय महाडिक दाखल झाले. तसेच पुणे येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी परिसराची पाहणी केली. सायंकाळपर्यंत मादी पिल्लांजवळ आली नव्हती.
याबाबत वन विभागाकडून सांगण्यात आले की, सदरची पिल्ले ही उसाच्या शेतात ऊस तोड कामगारांच्या निदर्शनास आली. या पिल्लांनी नुकतेच डोळे उघडले आहेत. त्यामध्ये दोन नर व एक मादी आहे. येथे पिल्ले व मादीवर देखरेख करण्यासाठी आजूबाजूला कॅमेरे लावण्यात आले आहेत. पिल्लांचे युरिन आजूबाजूच्या टाकण्यात आले आहे. जेणेकरुन मादी पिल्लांजवळ येईल व ती पिल्लांना सुरक्षित अधिवासात घेऊन जाईल.
पुणे येथून आलेल्या वेटनरी डॉक्टरांनी पिल्लांची तपासणी केली असता पिल्लांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सायंकाळी तिन्ही पिल्लांनी ओरडायला सुरुवात केली. पिल्लांच्या सुरक्षेसाठी मादी व बछडय़ांचे मिलन होणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मादी रात्रीच्या वेळेस पिल्लांच्या शोधात येईल व ती सुरक्षित अधिवासात पिलांना घेऊन जाईल, या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थांच्या भीतीत वाढ
वनवासमाचीत उसाच्या शेतात बिबटय़ाचे तीन बछडे आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱयांना अनेकदा शिवारात बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. बिबटय़ाने अनेकदा पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे येथे बिबटय़ाचे वास्तव्य आहे. त्यातच सोमवारी दुपारी बिबटय़ाची तीन बछडी उसाच्या आढळल्याने ग्रामस्थांच्या भीतीत आणखीन वाढ झाली.








