मुरगूड / वार्ताहर
निढोरी – कागल रस्त्यावर पिंपळगाव बुद्रुक पाटीजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून निढोरी ता. कागल येथील युवक शिवकुमार उर्फ नागेश रघुनाथ सुतार ( वय 28 वर्षे ) याचे निधन झाले. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निढोरी – कागल रस्त्याने बजाज प्लेटिना दुचाकीवरून नागेश रघूनाथ सुतार रा. निढोरी ता. कागल आणि त्याचे नातलग सचिन गोविंद सुतार रा. कडवे ता. शाहूवाडी हे दोघे कागलच्या दिशेने रात्री 8 वा.च्या सुमारास निघाले होते. पिंपळगाव बुद्रुक जवळ दामू म्होंगोरे यांच्या शेतासमोर शाहू कारखान्याला ऊस पुरवण्यासाठी जाणारी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली थांबली होती. या ट्रॉलीला दुचाकीची जोरात धडक बसल्याने नागेश सुतार रस्त्यावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. गंभीर जखमी अवस्थेतील नागेशला कोल्हापुरात खाजगी इस्पितळामध्ये उपचारार्थ दाखल केले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची वर्दी नामदेव पांडुरंग सुर्यवंशी पिंपळगाव बु॥ यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलिस नाईक एस. वाय. वर्णे करीत आहेत.
गावातील ओम साई कला क्रीडा सांस्कृतिक मंच आणि इंडियन स्पोर्टसचा तो सक्रिय सदस्य होता. मनमिळाऊ स्वभावाच्या नागेशचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते, विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 9 वा. आहे.
उसाच्या ट्रॉल्या देताहेत मरणाला आमंत्रण
मोठ्याने टेप लावून उसाने भरलेल्या अवजड ट्रॉल्या नेताना ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्यामुळे गेल्या पाच -सहा दिवसामध्ये परिसरात तीन मोठे अपघात झाले. काल बिद्रीजवळ ट्रॉलीला धडकून एकाचा बळी गेला. तर पाच सहा दिवसापूर्वी आदमापुरजवळ एसटीला ट्रॉली धडकून कॉलेज यूवती गंभीररित्या जखमी झाली. उभारलेल्या ट्रॉलीला धडकून निढोरीचा युवक आज मयत झाला. यामुळे उसाच्या ट्रॉल्या अपघाताला आमंत्रण ठरत आहेत. यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.