वार्ताहर /उसगांव
उसगांव येथे बायोडायजेस्टर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. उसगांव कोमुनिदादचे अध्यक्ष तुषार शेणवी उसगांवकर यांच्याहस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळी वास्कोचे गटविकास अधिकारी व उसगांव पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र प्रसिद्ध नाईक, सरपंच अस्मिता गावडे, उपसरपंच गुरुदास गावडे, पंचसदस्य रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू, दिनेश तारी, संगीता गांवकर व सीमा मास्कारेन्हास उपस्थित होते.
यावेळी अस्मिता गावडे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे आपत्कालीन व्यवस्थापनातर्फे 60 लाख खर्चून बांधकाम करण्यात येईल. उसगांव पंचायतीला पायाभूत साधन-सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे 50 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. या कचरा प्रकल्पात प्रतिदिन दहा हजार किलो ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून त्याद्वारे वीज, खत व गॅसची निर्मिती केली जाईल.
प्रत्येक पंचायत क्षेत्रात एमआरएफ सुविधा असणे गरजेचे आहे, असे उच्च न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे पंचायतीने उसगांव कोमुनिदादकडे जागेच्या मागणीसाठी अर्ज केला व कोमुनिदादने 6000 चौ. मि. जागा या प्रकल्पासाठी दिली. त्यामुळे सरपंच अस्मिता गावडे यांनी उसगांव कोमुनिदाद, स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचे आभार व्यक्त केले.









