प्रतिनिधी/ सातारा
गेल्या दोन दिवसांपासून तापमानात कमालीचा बदल झाला असून थंडी गायब होवून पारा 39 अंशावर पोहचला आहे. यामुळे एप्रिल महिन्यांच्या सुरूवातीलाच उन्हाच्या झळा बसत आहेत. तापमानात आणखी वाढ होईल, अशी चिन्हे दिसत असल्याने दुपारी 12 नंतर घराबाहेर न पडता घरातच वेळ घालवला जात आहे.
एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर तापमान वाढीने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमान तर सतत 35 अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही 35 अंशावर पोहोचले होते. आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनही कमाल तापमान 38 अंशापर्यंत आहे. यामुळे जिह्याच्या ग्रामीण भागात ऊन वाढल्याने शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे उरकून घेत आहे. शहरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून सातारकर उकाडय़ाने हैराण झाले आहेत. पुढील दीड महिना तरी उन्हाची तीव्रता राहणार आहे. जिह्यात किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. कधी 17 अंशापर्यंत खाली येते. तर काहीवेळा पारा 20 अंशापर्यंत जात आहे. मात्र कमाल तापमान 37 अंशावर कायम आहे. तरीही काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे कमाल तापमान वाढत असले तरी उतारही येत आहे. मात्र येत्या काही दिवसांत कमाल तापमान 40 अंशापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.








