खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन : ओरोसला कर्जमाफी सहविचार सभेत शेतकऱयांनी मांडल्या व्यथा
प्रतिनिधी / ओरोस:
महाराष्ट्र सरकारने विनाअट शेतकऱयांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. त्याचप्रमाणे खावटी, अन्य कृषी कर्ज, अल्पमुदत कर्ज, नियमित कर्ज परतफेड करणाऱया शेतकऱयांसाठी प्रोत्साहन अनुदान, मध्यम मुदत कर्जदार तसेच बागायतदारांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी जिल्हय़ातील शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी शासन कर्जमाफी सहविचार सभेत ओरोस येथे दिली.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत केवळ अल्पमुदत कर्जदार शेतकऱयांचा समावेश करण्यात आला आहे. मध्यम मुदत, खावटी, नियमित कर्ज परतफेड करणाऱयांना प्रोत्साहन अनुदान आदी बाबींचा समावेशही यामध्ये करण्यात यावा, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीचे धोरण ठरविण्याबाबत शेतकऱयांची सहविचार सभा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात आयोजित केली होती.
यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रकाश जैतापकर, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, जयप्रकाश चमणकर आदींसह जिल्हय़ातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
अन्य कर्जे माफ होण्यासाठी शिक्कामोर्तब
यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी एकदाच काय ती कर्जमाफी करावी. मात्र, पुढील दहा वर्षे कोणत्याही प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही, असे शेतकऱयांना सांगून टाकावे. अन्यथा खरे कर्जदार मरतील, असे स्पष्ट केले. या व्यतिरिक्त राजन नानचे (फोंडाघाट), रमेश गावकर (वेत्ये), वसंत केसरकर (शेतकरी संघटना) दादा नाईक (वेतोरे), कृषीभूषण संतोष गाडगीळ, भा. के. वारंग (कुडाळ), आळवे (सावंतवाडी), रवींद्र खानोलकर (वेंगुर्ले), बाळकृष्ण पाळेकर (मुटाट), जयप्रकाश चमणकर आदींनीही विचार व्यक्त केले. अल्प मुदत कर्जाबरोबरच अन्य कर्जेही माफ होण्याच्या विचारावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
शेतकऱयांच्या सूचना मुख्यमंत्र्याकडे मांडणार!
राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हय़ाची प्रामाणिकपणाची प्रतिमा सर्वदूर आहे. या शेतकऱयांना मजबूत आधार देण्याची गरज आहे. प्रोत्साहनात्मक अनुदान हा शद्ब कोकणच्या शेतकऱयांमुळेच आला. बँकांकडून कर्जदार शेतकऱयांची यादी घेण्याचे काम सुरू आहे. ती पूर्ण होताच जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार पैसे देण्याची योग्य ती कार्यवाही केली जाईल. दरम्यान, सहविचार सभेतील सूचना तसेच निवेदने शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केली जातील व योग्य तोडगा काढण्यात येईल. कोकणवासीयांना कर्जमाफीमधून चिंतामुक्त केले जाईल. एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ, असा शद्बही त्यांनी दिला.
प्रत्येक शेतकऱयाला कर्जमाफीचा लाभ होईल, यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. सतीश सावंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.









