वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना समस्येमुळे यंदाची आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करावी लागल्यानंतर बीसीसीआयने दुसऱया टप्प्यासाठी ठिकाणाची निवड करण्याची घाई करणार नसल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेचा लांबणीवर टाकण्यात आलेला दुसरा टप्पा इंग्लंडमध्ये खेळविण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरू आहे.
2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 31 सामने बाकी असताना कोरोनामुळे सदर स्पर्धा स्थगित करावी लागली. दरम्यान या उर्वरित सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यासाठी काही देशांनी इच्छुकता दर्शविली आहे. गुरूवारी आयसीसीच्या प्रमुख कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली. पण उर्वरित 31 सामन्यांसाठी ब्रिटनमधील काही केंद्राबाबत चर्चा झाली नसल्याचे आयसीसीच्या पदाधिकाऱयाने सांगितले.
येत्या ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे पण देशातील परिस्थिती चिंताजनक होत असल्याने ही स्पर्धा भारतातच होण्याची शक्यता दुरावली आहे. ही स्पर्धा आता भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
अर्धवट स्थितीतील आयपीएल स्पर्धेचे यजमानपद ब्रिटनला भूषविणे हे बेकायदेशीर आहे. मात्र ईसीबी आणि एमसीसी यांनी मात्र यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. येत्या सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयकडून आयपीएल स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यांच्या ठिकाणाबाबत निर्णय घेतला जाईल. संयुक्त अरब अमिरातमध्ये आयसीसीची आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएलचा दुसरा टप्पा भरविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.









