ऑनलाईन टीम / श्रीनगर :
उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात लष्कराला यश आले आहे. बाबर असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो 18 वर्षांचा आहे. त्याच्याकडून एके-47 रायफल, दोन ग्रेनेड आणि रेडिओ सेट जप्त करण्यात आला आहे. मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी याबाबत माहिती दिली.
वत्स म्हणाले, दहशतवादी घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर 18 सप्टेंबरपासून उरी येथील नियंत्रण रेषेवर लष्कराची कारवाई सुरू आहे. दरम्यान, या कालावधीत दोन दहशतवादी भारतीय सीमेवर तर चार दहशतवादी सीमेपलीकडे दिसून आले. सैन्याच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी माघार घेतली. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी एक दहशतवादीही ठार झाला होता. आज एका 18 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली. या घुसखोरीच्या कटांमुळे नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानचा कट पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.