वृत्तसंस्था/ लाहोर
पाकच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये नेहमीच वादग्रस्त ठरलेला फलंदाज उमर अकमल याच्यावर पीसीबीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मॅच फिक्सिंग प्रकरणात आपला अहवाल तो सादर करू न शकल्याने त्याला दोषी ठरविण्यात आले.
30 वर्षीय उमर अकमलला आता तीन वर्षांच्या कालावधीत क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात सहभागी होता येणार नाही, असे पीसीबीने सांगितले आहे. उमर अकमलच्या या बंदी कालावधीला 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आला आहे. कारण यापूर्वी सदर प्रकरणी पीसीबीने त्याच्यावर हंगामी स्वरूपात निलंबनाची कारवाई केली होती. उमर अकमलने 16 कसोटीत, 121 वनडे आणि 84 टी-20 सामन्यांत पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे.









