विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा : मुख्यमंत्री 50 लाख मदतीमुळे मिळणार आर्थिक पाठबळ
प्रतिनिधी / पणजी
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त केंद्राकडून मिळणाऱया 300 कोटी निधीतून प्रत्येक पंचायतीला 50 लाख रुपये देण्यात येणार असून त्यातून त्यांना कचरा प्रक्रिया आणि अन्य आवश्यक प्रकल्प प्राधान्याने उभारणे शक्य होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.
पंचायतींनी कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प स्थापन करण्याचा आदेश दिला होता. परंतु आर्थिक चणचण किंवा जमीन उपलब्ध नसणे यासारख्या कारणांमुळे अनेक पंचायतींनी खंडपीठाचा आदेश पाळणे शक्य झाले नव्हते. अशा पंचायतींना खंडपीठाने दंड ठोठावला आहे. त्यासंबंधी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. कोरोना लसीकरण जागृती अभियानच्या उद्घाटनानिमित्त आल्तिनो येथे आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री आज साधणार पंचायतींशी संवाद
स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेखाली आपण आज शनिवारी सर्व पंचायतींशी थेट बोलणार आहे. कचरा विल्हेवाटीसाठी अनेक पंचायतींना जमिनीची आवश्यकता आहे. काही पंचायतींनी याआधीच ते काम पूर्ण केले आहे. ज्यांना ते जमले नाही त्यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. ज्या पंचायत परिसरात कोमुनिदाद जमिनी आहेत. त्यातील थोडी जमीन त्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी वापरावी. सरकार त्यांना हवे ते सहकार्य देणार आहे. आता तर आम्ही 50 लाखपर्यंत मदतही जाहीर केली आहे. या पैशांमधून त्यांना कचरा प्रकल्पही स्थापन करता येणार आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या सुटणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरणासंबंधी भीती व गैरसमज दूर होतील
कोरोना लस घेण्यासाठी स्वतः आरोग्य कर्मचारीच पुढे येत नाहीत, अशावेळी सर्वसामान्य लोक कसे पुढे येतील? असे विचारले असता, लसीकरणासंबंधी अद्याप योग्य प्रकारे जागृती झालेली नाही. त्यासंबंधी अनेक गैरसमज आहेत, लोकांच्या मनात भीती आहे. कोरोना लसीकरण जागृती अभियानद्वारे ही भीती व गैरसमज दूर होतील व लसीकरणासाठी लोक पुढे येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. आता कोरोनायोद्यांना लस देण्यात येणार असून तिसऱया टप्प्यात सर्वसामान्य जनतेसाठी लसीकरण मोहीम आरंभ करण्यात येणार आहे. शक्यतो या महिन्यातच कोरोनायोद्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वसामान्य लोकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात येईल.
निदान आरोग्याच्या विषयात राजकारण नको
लसीकरणासंबंधी अफवा किंवा गैरसमज पसरविणे योग्य नव्हे. निदान राजकारण्यांनी तरी या पातळीवर येऊ नये. राजकीय आरोप कितीही करा, आरोग्याच्या विषयात राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणात देशभरात कुठेही त्याचे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यामुळे विरोध करण्यापेक्षा शक्य असेल तर लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









