वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारताच्या वाढत्या प्रभावामुळे चीन त्याला स्वतःचा प्रतिस्पर्धी मानत असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले गेले आहे. अमेरिका, त्याचे सहकारी आणि अन्य लोकशाहीवादी देशांसोबत भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. जागतिक महासत्तेच्या रुपात अमेरिकेला विस्थापित करण्यासाठी ड्रगन हे करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हे विस्तृत धोरण दस्तऐवज समोर आले आहे. चीन क्षेत्रातील अनेक देशांची सुरक्षा, स्वायत्तता आणि आर्थिक हितांना धोका पोहोचवत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत नवी दिल्लीची रणनीतिक भागीदारी आणि अन्य लोकशाहींसोबत त्याच्या संबंधांना धक्का देण्याचा चीनचा डाव आहे. आर्थिकदृष्टय़ा अडकवून बीजिंगच्या महत्त्वाकांक्षांना समायोजित करून भारताला त्याकरता बाध्य करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
अमेरिका आणि जगभरातील देशांमध्ये जागरुकता वाढत आहे. सत्तारुढ चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने महान शक्तींच्या प्रतिस्पर्धेच्या नव्या युगाची सुरुवात केल्याचे अमेरिकन विदेश मंत्रालयाच्या 70 पानी अहवालात म्हटले गेले आहे.









