जलक्रीडा कारवाईप्रकरणी पर्यटन व्यावसायिकांचा इशारा
मालवण:
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या स्थानिक बंदर कार्यालयाकडून झालेली दंडात्मक कारवाई त्यांच्या नियमानुसार झाली आहे हे मान्य आहे. परंतु जलक्रीडा पर्यटन रितसर सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली असताना त्याला विलंब होत असेल, तर त्यात दोष कुणाचा, याचा विचार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने नक्की करावा. कोरोना महामारीमुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पण उपाशी मरण्यापेक्षा न्याय हक्कांसाठी आम्ही येथील बंदर कार्यालयासमोर लवकरच उपोषणास बसणार, असल्याचा इशारा अन्वय प्रभू व रश्मीन रोगे यांनी दिला आहे.
काल आम्ही जलक्रीडा पर्यटनास अनधिकृतपणे सुरुवात केल्याचे कारण दाखवून बंदर विभागाने आमच्यावर दंडात्मक कारवाई केली. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यामुळे आज सिंधुदुर्गात पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही पर्यटन सुरू केले आहे. मात्र, देशात इतर ठिकाणी सगळीकडे पर्यटन सुरू झाले असताना मालवणात आडकाठी केली जात आहे. कोरोनामुळे गेले सहा महिने आम्ही बेरोजगार होतो. परंतु बँकांचे कर्जहफ्ते, घरपट्टी, वीजबिल माफी आम्हाला मिळालेली नाही. आज जेव्हा पर्यटन सुरू केले, तेव्हा दंडात्मक कारवाईसाठी मात्र बंदर विभाग सरसावतोय, याचेच दु:ख वाटते, असे प्रभू व रोगे म्हणाले.
अनधिकृत मासेमारीवर कारवाई का नाही?
आम्ही पर्यटन व्यावसायिक पारंपरिक मच्छीमारच आहोत. बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी आणि हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे आम्ही मत्स्य दुष्काळच्या खाईत ढकलले गेलो आहोत. अशा प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातत्याने करूनही मत्स्य विभाग दुर्लक्ष करतो. दुसरीकडे बंदर विभाग कमालीची तत्परता दाखवितो, अशी टीका पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली.