प्रतिनिधी/मिरज
सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी लोणी बाजारातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविताना एका फेरीवाल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तर अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निनावी फोनद्वारे धमक्यांचे फोन येत आहेत. या घटनेने महापालिका कर्मचाऱ्यांत पुन्हा खळबळ माजली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही फेरीवाल्यांच्यावरील कारवाई सुरूच होती. आजही काही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
बुधवारी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करीत असताना मारहाण झाली होती. मारहाणीनंतर दुसऱ्या दिवशी मनपाने फेरीवाल्यांविरोधात धडाकेबाज मोहिम हाती घेऊन दोनशेहून अधिक हातगाड्या जप्त केल्या होत्या. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहिम सुरू होती. लोणीबाजार परिसरात सकाळी उपायुक्त स्मृती पाटील या मोहिमेत सहभागी झाल्या असता एका हातगाडीवाल्याने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या सावध असल्याने बाजूला झाल्या. त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सदर फेरीवाल्याला पकडून जाब विचारला. त्यावेळी त्याने गाडी वेगात नेण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून ती उपायुक्तांच्या अंगावर गेल्याचे सांगितले. मात्र, या प्रकारामुळे त्याची गाडी जप्त करण्यात आली.
दरम्यान, फेरीवाल्यांच्यावर धडक कारवाई सुरू झाल्याने आणि मोठ्या संख्येने गाड्या जप्त करण्यात आल्याने महापालिका अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. निनावी फोनद्वारे त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात येत आहे. यापुढे कारवाई कराल तर जीवाला मुकाल, अशाही धमक्या दिल्या जात आहेत. या निनावी फोन कॉलिंग मागचा मास्टरमाईंड कोण? याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे.
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले
Next Article बेळगाव- चेन्नई व्हाया म्हैसूर विमानसेवा होणार सुरू









