आयर्लंडचा 35 धावांनी पराभव, कर्णधार विल्यम्सन सामनावीर, आयर्लंडच्या लिटलची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ ऍडलेड
आयसीसी टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडने सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धेतील शुक्रवारच्या शेवटच्या महत्त्वाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार विल्यम्सनने 35 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. आयर्लंडच्या जोश लिटलने हॅट्ट्रिक नोंदविली.
या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने गट-1 मधून सर्वप्रथम उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. न्यूझीलंडने स्पर्धेच्या गुणतक्त्यात गट-1 मधून 7 गुणांसह तसेच +2.113 नेट रनरेटसह पहिले स्थान पटकावले आहे. या गटात सध्या इंग्लंड 5 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. इंग्लंडला उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी लंकेला शेवटच्या सामन्यात पराभूत करावे लागेल. इंग्लंडने 5 गुणांसह +0.547 नेट रनरेट राखला आहे. या गटात ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान मिळविले आहे. त्यांनीही 7 गुण नोंदविले असून त्यांचा नेट रनरेट -0.173 असा आहे. श्रीलंकेने आता या गटातील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला तर मात्र ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठता येईल. ऑस्ट्रेलियाने या गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात शुक्रवारी अफगाणचा केवळ 4 धावांनी निसटता पराभव केला. या स्पर्धेमध्ये गेल्या खेपेला न्यूझीलंडने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकाविले होते. विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाला मात्र यावेळी उपांत्यफेरी गाठण्यासाठी नशिबाची साथ लाभण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

गुरुवारच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 20 षटकात 5 बाद 150 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 35 धावांनी गमवावा लागला. मध्यंतरी पावसाचा अडथळा आल्याने काही वेळ खेळ थांबवावा लागला होता.
न्यूझीलंडच्या डावामध्ये ऍलेन आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करताना 5.5 षटकात 52 धावांची भागीदारी केली. ऍलेनने 18 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. ऍडेरने ऍलेनला झेलबाद केले. त्यानंतर कॉनवे डेलॅनीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 33 चेंडूत 2 चौकारांसह 28 धावा जमविताना कर्णधार विल्यम्सनसमवेत दुसऱया गडय़ासाठी 44 धावांची भर घातली. या स्पर्धेत पहिल्यांदाच कर्णधार विल्यम्सनने आपला स्ट्राईकरेट 100 पेक्षा अधिक राखला. त्याने 35 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 61 धावांचे योगदान दिले. फॉर्ममध्ये असलेल्या फिलिप्सने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. मिचेलने 21 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 31 धावा झळकविल्या. आयर्लंडचा लिटल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने हॅट्ट्रिक साधली. त्याने 22 धावात 3 तर डेलॅनीने 30 धावात 2 तसेच ऍडेरने 39 धावात 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या लिटलने आपल्या एका षटकात पाठोपाठच्या सलग तीन चेंडूंवर न्यूझीलंडच्या विल्यम्सन, नीशम आणि सँटनर यांचे बळी मिळविले. विल्यम्सन झेलबाद झाला तर नीशम आणि सँटनर हे पायचीत झाले. या दोन्ही फलंदाजांना खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. कर्णधार बलबिर्नी आणि पॉल स्टर्लिंग या जोडीने डावाला सावध सुरुवात करताना 8.1 षटकात 68 धावांची भागीदारी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर आयर्लंडची फलंदाजी कोलमडली. न्यूझीलंडच्या सँटनर आणि सोधी यांची गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली. या फिरकी गोलंदाजांनी आयर्लंडच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. आयर्लंडच्या डावात डेलॅनीने 2 चौकारांसह 10, टकरने 13 तर डॉकरेलने 15 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. लिटलने 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसनने 22 धावात 3, साऊदीने 29 धावात 2, सोधीने 31 धावात 2 तसेच सँटनरने 26 धावात 2 बळी मिळविले. या स्पर्धेमध्ये विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी दणदणीत पराभव करून दणकेबाज प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी लंकेवर 65 धावांनी विजय मिळविला. अफगाणबरोबरचा सामना पावसामुळे वाया गेला. न्यूझीलंड संघाला ब्रिस्बेनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडचा या स्पर्धेतील हा एकमेव पराभव ठरला. शुक्रवारच्या सामन्यात आयर्लंड संघातर्फे 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 6 बाद 185 (विल्यम्सन 61, ऍलेन 32, मिचेल नाबाद 31, कॉनवे 28, फिलिप्स 17, लिटल 3-22, डिलेनी 2-30, ऍडेर 1-39), आयर्लंड 20 षटकात 9 बाद 150 (स्टर्लिंग 37, बलबिर्नी 30, टकर 13, डेलॅनी 10, डॉकरेल 23, फर्ग्युसन 3-22, सँटनर 2-26, सोधी 2-31, साऊदी 2-29).









