राजकीय वर्तुळात खळबळ : चिक्कमंगळूर जिल्हय़ातील मंगेनहळ्ळी येथे रेल्वेखाली दिले झोकून
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा (वय 63) यांनी सोमवारी मध्यरात्री रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहे. या घटनेमुळे राज्य राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाटकाच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. 15 डिसेंबर रोजी विधानपरिषदेत घडलेल्या धक्काबुक्की, गदारोळानंतर धर्मेगौडा तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली का?, या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.
चिक्कमंगळूर जिल्हय़ातील कडूर तालुक्याच्या सखरायपट्टण येथील घरी जेवण केल्यानंतर सोमवारी रात्री 11 च्या सुमारास धर्मेगौडा सुरक्षा रक्षकांना घरीच राहण्यास सांगून आपली काळय़ा रंगाची सँट्रो कार घेऊन चालकासह घराबाहेर पडले. तत्पूर्वी त्यांनी हेमंत नामक व्यक्तीला आपल्याला बेंगळूरला जायचे आहे, असे सांगून कोणती रेल्वे कोणत्या वेळेला येते याची माहिती घेतली. त्यानंतर ते गुणसागरजवळील मंगेनहळ्ळी पुलाजवळ आले. त्यानंतर आपल्याला एका व्यक्तीशी वैयक्तिकपणे चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांनी कारचालकाला उतरविले आणि स्वतः कार घेऊन जवळच असलेल्या शेतालगत कार थांबवून हुबळीहून बेंगळूरच्या दिशेने निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसखाली झोकून देऊन आत्महत्या केली. यावेळी स्थानिकांना आपली ओळख सापडू नये यासाठी त्यांनी आपला चेहरा कापडाने झाकला होता, असे समजते.

रात्री बराच वेळ झाला तरी धर्मेगौडा घरी न परतल्याने भयभीत झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी धर्मेगौडा यांना फोन केला. मात्र, मोबाईल स्वीच ऑफ आल्याने कुटुंबीयांनी कारचालकाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने देखील मोबाईल स्वीच ऑफ येत असल्याचे सांगितले. त्यानंतर सखरायपट्टण पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली. नंतर धर्मेगौडा यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, निजद कार्यकर्त्यांनी मध्यरात्री 12 पासून 2.30 पर्यंत प्रयत्न केले. मात्र, धर्मेगौडा यांचा शोध लागला नाही. मध्यरात्री 3 वाजता रेल्वे रुळाजवळ मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता धडावेगळे झालेले शिर धर्मेगौडा यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी चिक्कमंगळूरचे जिल्हाधिकारी डॉ. गौतम बगादी, जिल्हा पोलीसप्रमुख अक्षय, धर्मेगौडा यांचे बंधू विधानपरिषद सदस्य एस. एल. भोजेगोडा, आमदार सी. टी. रवी, कडूरचे आमदार बेळ्ळी प्रकाश आदींनी भेट दिली. शिमोगा शासकीय इस्पितळात विच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी सखरायपट्टण येथे शासकीय इतमामात धर्मेगौडा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, गृहमंत्री बसवराज बोम्माई आदी मान्यवरांनी धर्मेगौडा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
विधानपरिषदेत झाली होती धक्काबुक्की
राज्यात निजद आणि काँग्रेस पक्षाचे युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर धर्मेगौडा यांची विधानपरिषद उपसभापतीपदी निवड करण्यात आली होती. भाजप सत्तेवर आल्याने काँग्रेसचे सदस्य असणारे विधानपरिषद सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांना पदच्युत करण्यासाठी भाजपच्या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय निजदने घेतला. त्यानुसार 15 डिसेंबर रोजी विधानपरिषदेत धर्मेगौडा यांच्या नेतृत्वाखालीच सभागृहाचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी धर्मेगौडा यांना सभापतींच्या खुर्चीवरून हटवून धक्काबुक्की करत खाली पाडण्यात आले होते. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती.
सहकार क्षेत्रातून भरीव कामगिरी
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे धर्मेगौडा यांनी तत्कालिन मंडल पंचायतीचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी उद्देबोरनहळ्ळी सहकारी संघ, दूध उत्पादक सहकारी संघ, चिक्कमंगळूर जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, जनता बाजार आदी सहकारी क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले होते. तोटय़ात असलेल्या डीसीसी बँकेचा कायापालटही त्यांनी केला. अपेक्स बँकेचे उपाध्यक्ष, सहकार महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
चौकट….
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीविषयी गूढ कायम
विधानपरिषद उपसभापती धर्मेगौडा यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानी चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी रेल्वे रुळाशेजारीच आढळली आहे. रेल्वे पोलिसांनी सदर चिठ्ठीतील मजकूर उघड केला नाही. त्यामुळे धर्मेगौडा यांच्या आत्महत्येमागील गूढ कायम आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी देखील याविषयी माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. सदर चिठ्ठीत धर्मेगौडा यांनी त्यांनी आपली मालमत्ता कोणाकोणाच्या नावे करावी, याचा उल्लेख केल्याचे समजते.









