इसेन्शियल ऑईलबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आपल्या दैनंदिन सौंदर्यसाधनेत या सुगंधी तेलांचा फारसा समावेश नसतो. सलून किंवा स्पामध्ये गेल्यावर या तेलांचा सुगंध आपल्याला जाणवतो. पण ही इसेन्शियल ऑईल्स फक्त स्पा आणि सलून्सपुरती मर्यादित नाहीत. ती तुमच्या सौंदर्यसाधनेचा भाग व्हायला हवीत. फक्त त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही ही तेलं खूपच उपयोगी आहेत. यातले औषधी गुणधर्म खूप लाभदायी ठरू शकतात. या तेलांच्या वापराने चेहर्यावरील सुरकुत्या कमी होतात. ही तेलं त्वचा आतून बाहेरून स्वच्छ करतात. त्वचेला ओलावा देण्यासोबतच पिंपल्सचे डाग, अन्य काळे डाग कमी करण्याचं कामही साधलं जातं. त्वचेचा पोतही सुधारतो. या तेलांमुळे केसांची चांगली वाढ होते. स्कॅल्पला पोषण मिळतं तसंच केसांना बळकटी मिळून ते चमकदारही होतात.
या तेलांचा वापर अगदी सहज करता येतो. विविध तेलं एकत्र करून चेहर्याला पोषण देणारं तेलही तयार करता येईल. यासाठी अर्गन आणि रोझ हिप तेल प्रत्येकी 50 मिली आणि प्रत्येकी दोन मिली रोझमेरी व फ्रँकिनसेन्स ही तेलं घ्या. ही तेलं एकत्र करून एका बाटलीत भरून ठेवा. नियमितपणे चेहर्याला लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागेल. काही दिवसात फरक स्पष्ट जाणवेल. घरीच स्पासारखी अनुभूती घ्यायची असेल किंवा थोडं रिलॅक्स व्हायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यात लवेंडर ऑईलने दोन-चार थेंब घाला.
केसांसाठी तेल बनवत असाल तर सहा थेंब पचौली तेल, दहा मिली ऑलिव्ह ऑईल घ्या. मिश्रण तयार करा. या तेलाने केसांना मसाज करा. काही दिवसांनंतर फरक जाणवेल. कोणतंही इसेन्शियल ऑईल वापरण्याआधी त्याचे उपयोग आणि वापरण्याची पद्धत नक्की जाणून घ्या.









