प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत जावू तेथे खावू याप्रमाणे प्रत्येक कामात टक्केवारी घेतली जाते. कोणाची किती टक्केवारी आहे त्याबाबतचे वृत्त तरुण भारतने सहा महिन्यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्यावरुन पालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी सावध व्हायला हवे होते. मात्र, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे भ्रष्टाचाराचे प्यादेच असून मुख्य भ्रष्टाचाराचे लोण मोठे आहे. पालिकेत कोणी कुठे कसे काढायचे याचे मार्गदर्शन करणारे बडे फंटर मात्र वाऱयावर असून त्यांच्या सल्ला देणारे अनेकजण आहेत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे अनेकांची जरी तंतरली असली तरीही आणखी नावे कोणाकोणाची पुढे येणार याचीही उलटसुलट चर्चा सुरु आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागासह सर्वच विभागात भ्रष्टाचाराचे कुरण आहे. प्रत्येक कामात टक्का हा ठरलेलाच असतो. त्याची वाटणी कशी कोणापर्यंत करायची याचे नियोजन काही बडे फंटर मार्गदर्शन करुन सांगत असतात. त्यांचा दरारा पालिकेत मोठा आहे. सर्व अधिकारीही त्यांच्याच सल्ल्यानुसार चालतात. गतवर्षी घंटागाडीच्या ठेकेदारांकडून दर महिन्याला बिल काढण्यासाठी टक्केवारी घेतली जात होती. टक्केवारी घेतल्याशिवाय बिलच काढले जात नव्हते. बिल काढण्यापूर्वी पैसे कोठे दिले जायचे हेही काही बडे फंटर ठरवत होते. संबंधित ठेकेदारास तसे अधिकाऱयांना सांगून हे पैसे स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार आल्यापासून ते खुल्या दिलाने सर्वांशी वागत होते. सहज म्हणून बोलत होते. त्याचाच फायदा नेमका पालिकेच्या मार्गदर्शकांनी घेत त्यांना पुढे केल्याची जोरात चर्चा आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या घंटागाडीच्या ठेकेदाराला सुरुवातीपासून अडवले. पिचवले जात होते. ज्या प्रमाणे साशा कंपनीच्या नावाखाली अनेकजण बडे झाले तसाच प्रकार सध्या करता येईल म्हणून प्यादे म्हणून संचित धुमाळ यांचा वापर करण्यात आला. त्यांनाही अधिकारी म्हणून भ्रष्टाचाराचा बट्टा लागला आहे.
तरुण भारतने सहा महिन्यापूर्वीच क्लिपचे वृत्त प्रसिद्ध केले होते
आरोग्य विभागात बिलासाठी कोण किती टक्के मागते अन् कशी टक्केवारी पोहच केली जाते.त्याबाबत तरुण भारतने प्रसिद्ध केले आहे.त्यावरुन तरी आरोग्य विभागाने सावध होवून सातारकरांची सेवा भ्रष्टाचारमुक्त करायला हवी होती. परंतु तशी सेवा न करता भ्रष्टाचाराचे पुरावे एकेक गोळा होत होते तरीही यांनी ते जाणले नाही.